दुसऱ्यांदा UPSC परीक्षेत यश, यंदा रँकमध्येही सरशी, उस्मानाबादच्या निलेशची गगनभरारी! 

भारतीय लोकसेवा आयोग- यूपीएससीच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवेच्या परीक्षेत उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील निलेश श्रीकांत गायकवाड हे राष्ट्रीय पातळीवरून 629 रँकने उत्तीर्ण झाले आहेत.

दुसऱ्यांदा UPSC परीक्षेत यश, यंदा रँकमध्येही सरशी, उस्मानाबादच्या निलेशची गगनभरारी! 
निलेश गायकवाड यांचं यूपीएससी परीक्षेत यश

उ्स्मानाबाद : भारतीय लोकसेवा आयोग- यूपीएससीच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवेच्या परीक्षेत उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील निलेश श्रीकांत गायकवाड हे राष्ट्रीय पातळीवरून 629 रँकने उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या गौरवशाली शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

दुसऱ्यांदा UPSC परीक्षेत यश

गेल्यावर्षी ते यूपीएसी परीक्षेत भारतीय पातळीवरून 752 रँकने उत्तीर्ण झाले होते. संरक्षण सहाय्यक नियंत्रक पदी त्यांची नियुक्ती झाली होती. सध्या त्यांची ट्रेनिंग सुरु आहे.सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी हे यश मिळवले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

‘खाजगी सेवेत मर्यादा, युपीएससीकडे वळालो’

त्यांचे प्राथमिक शिक्षण श्री केशवराज विद्यालय येथे तर माध्यमिक शिक्षण श्री देशिकेंद्र विद्यालय लातूर येथे झाले आहे. ते आयआयटी मुंबई येथून केमिकल इंजिनीरिंग मध्ये बी. टेक.आणि एम.टेक.झाले आहेत. त्यानंतर त्यांनी गॅलॅक्सि सरफेक्टन्स लिमिटेड मध्ये इंटर्नशिप केली. बेंगलोर येथे झीनोव्ह कन्सल्टन्सी कंपनीमध्ये “सहयोगी कंन्सलटन्ट” म्हूणन सेवेत असताना त्यांना आपल्या कार्याच्या मर्यादा लक्षात आल्या त्यामुळे ते यूपीएससीकडे वळले.

नेतृत्वगुण हा स्थायीभाव, लहानपासूनच अभ्यासाची आवड, विविध स्पर्धांमध्येही यश

नेतृत्ववृत्ती हा त्यांचा गुण असून मुंबई येथील आयआयटी मध्ये शिक्षण घेताना ते जनरल सेक्रेटरी पदी निवडून आले होते. विद्यार्थी जीवनात त्यांनी विविध स्पर्धा निबंध, कथाकथन, वादविवाद,वक्तृत्व, चित्रकला, रंगभरण, प्रश्न मंजुषा, एकपात्री अभिनय, एनसीसी, वैज्ञानिक प्रयोग यामध्ये हिरीहिरीने सहभाग घेतला आहे.तसेच त्यांनी राष्ट्रीय व महाराष्ट्र पातळीवरील प्रज्ञा शोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, डॉ होमी भाभा वैज्ञानिक परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षा,स्वयं अध्ययन परीक्षा, सामान्य ज्ञान परीक्षा, गणित या विषयातील पूर्वप्रथमा, प्रथमा, द्वितीया, प्रबोध, सुबोध परीक्षा,इंग्रजी विषयातील एन्टरन्स, प्रायमरी, इंटरमेडियट,अँडव्हान्सड परीक्षा, हिंदी विषयातील नागरी बोध परीक्षा, अखिल भारतीय संस्कृत ज्ञान परीक्षा यामध्ये विशेष प्राविण्य मिळविले आहे.

यशाचं गुपित सांगितलं!

आकाशवाणी केंद्रावरुन त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. अटल बिहारी वाजपेयी संस्था मनाली येथून त्यांनी बेसिक माऊंटरिंग कोर्स केला आहे. त्यांचे वक्तिमत्व बहुगुणी, अष्टपैलू स्वरूपाचे आहे, हे विविध प्रकारच्या यशस्वितेवरून लक्षात येते. त्यांच्या मते,आपली इच्छाशक्ती, आत्मविश्वास, चिकाटी यामधून आपल्यातील उर्मी वाढते. निश्चित संकल्प, योग्य मार्गदर्शन, झोकून देऊन मेहनत करण्याची तयारी, सूक्ष्म नियोजन, त्यानुसार सातत्यपूर्ण अभ्यास केल्याने यश हमखास मिळू शकते. त्यासाठी योग्य प्रकारची रणनीती आखावी लागते. एकदा का यश मिळाले की आयुष्यभर मानसन्मान, प्रतिष्ठा मिळते. समाजाचे देणे देता येते, समाजासाठी काही करता येते, असे त्यांनी सांगितले. यशाचे गमक कठोर परिश्रम आणि जिद्द होय, असं यशाचं गुपित त्यांनी सांगितलं.

महत्वकांक्षेचा प्रेरणादायी प्रवास

प्रशासकीय सेवेत रूजू होण्याचा एक महत्पूर्ण राजमार्ग यूपीएससी परीक्षा असली तरी त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात, हे मात्र खरे. या परीक्षेत चालू घडामोडींचे सूक्ष्म ज्ञान,सामान्य ज्ञान तपासले जाते.सामान्य ज्ञान हे चालू घडामोडींचे अपडेट्स ठेवल्याने वाढते. त्याअनुषंगाने परीक्षेशी संबंधित साहित्याचा अभ्यास करणे, प्रश्नसंच सोडविण्याचा सराव करणे गरजेचे आहे,असे त्यांनी सांगितले.त्यांच्या या वाटचालीस महत्वकांक्षेचा प्रेरणादायी प्रवास असेच म्हणता येईल.

निवड झाली नाही तर खचू नका, पुन्हा जोमाने तयारी करा

अलीकडील काळात स्पर्धा परीक्षेची काठिण्य पातळी वाढत आहे. त्याचे कारण म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये होणारी वाढ होय. अशा स्थितीत आपण अभ्यासात लक्ष केंद्रित करावयास हवे. सातत्यपूर्ण अभ्यास करुनही प्रसंगी अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून खचून जाता कामा नये. आपल्यातील उणिवा शोधून त्यात सुधारणा करणे, तत्कालीन उद्भवणाऱ्या प्रश्नांचे उत्तर आपणच शोधणे, सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन नव्या जोमाने अभ्यासाला लागणे गरजेचे असते,असे त्यांनी सांगितले.

आई वडिलांच्या मार्गदर्शनाला यशाचं श्रेय

शासन आणि प्रशासन ही दोन चाके आहेत. या दोन्हीही घटकांनी लोकाभिमुख काम करण्यासाठी प्रयत्न केले, कोणताही प्रश्न टाळण्यापेक्षा संवेदनशील बनवून तो सोडविण्यावर भर दिला, समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन लोकाभिमुख कारभार केला, चांगल्या कामावर ठाम राहिले तर शासन आणि प्रशासन या दोन्हीची प्रतिमा चांगली बनू शकते, असे त्यांना वाटते. वडील प्रा.डॉ.श्रीकांत गायकवाड, आई प्रा.अनिता गायकवाड, भाऊ शैलेश आणि शिक्षकांची प्रेरणा, मार्गदर्शन यामुळेच हे यश मिळू शकले असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा :

UPSC Result 2021 | युपीएससीत लातूरच्या सेव्हनस्टार्सचे अभूतपूर्व यश, जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI