कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी उस्मानाबाद सज्ज, 7 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, 3 लिक्विड टँकमधून दररोज 73 टन ऑक्सिजन निर्मिती

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण होणार आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी उस्मानाबाद सज्ज, 7 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, 3 लिक्विड टँकमधून दररोज 73 टन ऑक्सिजन निर्मिती
कौस्तुभ दिवेगावकर, (जिल्हाधिकारी उस्मानाबाद)
संतोष जाधव

| Edited By: Akshay Adhav

Jul 02, 2021 | 8:23 AM

उस्मानाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण होणार आहे. 7 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासह 3 लिक्विड टँकमधून दररोज 73.36 टन ऑक्सिजन निर्मिती होणार आहे यासाठी प्रकल्पाचे काम सुरु आहे. (Osmanabad ready To fight Corona 3rd Wave 7 Oxygen Generation Projects, 73 Tons of Oxygen Production per Day from 3 Liquid Tanks)

पहिल्या लाटेआधी जिल्ह्यात एकही ऑक्सिजन प्लान्ट नव्हता

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उस्मानाबाद जिल्ह्यात प्रतिदिन 21.56 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज होती. मात्र कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतील गरज वाढल्यास त्याअगोदरच तिप्पट ऑक्सिजन निर्मिती उपलब्धता करण्यात आली आहे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नवीन 16 ड्युरा सिलेंडर खरेदी करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कोरोनाची पहिली लाट येण्यापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यात एकही ऑक्सिजन प्लान्ट नव्हता.

ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडमध्ये वाढ

कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा हळूहळू सक्षम झाली आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडमध्ये वाढ झाली आहे. आयसीयू बेडची संख्या 16 वरून 257 झाली आहे तर व्हेंटिलेटर बेडची संख्या 16 वरून 160 झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयात 47 ऑक्सिजन बेड होते मात्र आता ते 1 हजार 165 झाले आहेत. कोरोना पूर्वी सर्व प्रकारचे बेड मिळून 825 बेड होते तर आता ही संख्या 4 हजार 376 झाली असल्याने आरोग्य यंत्रणा सक्षम झाली आहे. ग्रामीण रुग्णालयसह प्राथमिक आरोग्य केंद्रातही अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. सध्या दररोज 50 ते 100 च्या घरात नवीन रुग्ण सापडत आहेत. जिल्ह्यात सध्या 578 कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर कोरोनाने 1 हजार 373 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यू दर 2.34 टक्के आहे. 58 हजार 434 पैकी 56 हजार 483 रुग्ण कोरोना मुक्त झाले असुन रुग्ण उपचारनंतर बरे होण्याचा दर 96.66 टक्के आहे.

तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना अधिक धोका, शासकिय रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याने लहान मुलांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे तर स्वतंत्र खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या जे नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत त्यापैकी जवळपास 10 ते 15 टक्के ही 0 ते 18 या वयोगटातील बालकांचा समावेश आहे. त्यामुळे ही बाब चिंताजनक असून त्या दृष्टीने प्रशासनाने जिल्हा स्तरावर बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स तयार केली आहे. गरोदर महिलांच्या वैद्यकीय व्यवस्था व प्रसुतीसाठी जिल्हा शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचं विशेष आवाहन

कोरोना आजाराबाबत कोणतीही प्राथमिक लक्षणे सापडल्यानंतर नागरिकांनी डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य तो वैद्यकीय उपचार घ्यावा तसेच लसीकरण करावे. कोरोना लाट रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणेसह इतर नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

(Osmanabad ready To fight Corona 3rd Wave 7 Oxygen Generation Projects, 73 Tons of Oxygen Production per Day from 3 Liquid Tanks)

हे ही वाचा :

काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही, जयंत पाटलांचा टोला

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें