डॉ. राहुल गेठेंचे भामरागड ‘कनेक्शन’; प्रकाश आमटेंशी बोलताना नानांची भन्नाट ‘रिॲक्शन’
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि प्रसिद्ध, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यात रविवारी सकाळी दिलखुलास गप्पा रंगल्या आणि दोघांमधील घट्ट मैत्रीचा बंध नजरेत आला. प्रकाश आमटे आणि नानांमधील संवादाचे, निमित्त ठरले, ते नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे

भामरागड : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि प्रसिद्ध, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यात रविवारी सकाळी दिलखुलास गप्पा रंगल्या आणि दोघांमधील घट्ट मैत्रीचा बंध नजरेत आला ! दोघांनीही एकमेकांची आणि कुटुंबियांची आपुलकीने विचारपूस केली. तेवढ्यात, नानांच्या वाढदिवसाचा मुद्दा पुढे आला आणि ‘वयाला वाढायला अक्कल लागते का’ अशा आपल्या खास शैलीत नानांनी आपल्याच ‘पंचाहत्तरी’वरून दिलखुलास ‘डायलॉग’बाजी केली. चित्रपटाचे चित्रीकरण असो, वा भल्याभल्या राजकारण्यांसोबतचा संवाद असो; नाहीतर खास मित्रांसोबतच्या गप्पा असतील; नाना हे नेहमीच विनोदी, मार्मिक बाणा दाखवून आपल्यातील मोकळेपणा सहजतेने उघड करतात आणि धमाल उडवून देतात.
प्रकाश आमटे आणि नानांमधील संवादाचे, निमित्त ठरले, ते नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या भामरागड भेटीचे! डॉ. गेठे यांनी ‘हिडिओ कॉल’करून दोघांचे मनसोक्त बोलणे करून दिले. यानिमित्ताने दोघेही जुन्या आठवणींत रमले. हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजासाठी नागपूरमध्ये असलेल्या डॉ. गेठे यांनी भामरागड येथे प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांची घरी जाऊन भेट घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असल्यापासून डॉ. गेठे यांची आमटे कुटुंबियांसोबत जवळीक आहे. त्यातून डॉ. गेठे यांनी आमटे यांची भेट घेतली आणि तिथे लगेचच नानांची आठवण निघाली. तेव्हा, आमटे आणि नानांमध्ये मोकळेपणाचा संवाद झाला.
पुढील महिन्यात म्हणजे, १ जानेवारी २०२६ रोजी नाना पाटेकर हे पंचाहत्तरी पूर्ण करतील. त्याचा धागा पकडून, आमटे यांनी नानांकडे पंचाहत्तरीची विचारणा केली. त्यावर नानांनी क्षणात, ‘वयाला वाढायला अक्कल लागते का, अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली; तेव्हा दोघेही खळखळून हसले. आमटे दांपत्य, नाना आणि डॉ. गेठे यांच्यातील संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
