पंतप्रधान मोदींसोबत दिल्लीत ‘या’ एकाच विषयावर तब्बल अर्धा तास चर्चा, उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर सभेत सांगून टाकलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे प्रमुख म्हणू २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परभणीमध्ये शिवसेनेकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंनी मोठं भाषण केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो. त्यांनी मला एक तासाचा वेळ दिला. या एक तासापैकी अर्धा तास त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळावर चर्चा केली असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परभणीमध्ये बोलताना केला आहे. परभणीमध्ये शिवसेनेता कार्यक्रम सुरु असून त्याठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महिलांना सायकल आणि शिलाई मशीनचं वाटप केलं गेलं आहे. सरकारचे प्रमुख म्हणून मोदींची २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शिंदेंनी मोठं भाषण केलं. त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
दुष्काळाच्या या परिस्थितीमध्ये सरकार तुमच्या पाठिशी ठामपणे उभा असून शेतकऱ्यांनो खचून जाऊ नका असं म्हटलं आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केलेला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी आम्हाला माहिती आहेत. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. मला देखील जाणीव आहे. हा एकनाथ शिंदे शेतकऱ्यांचा पुत्र आहे. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. पंतप्रधान देखील म्हणाले की, शिंदे तुम्ही चिंता करु नका. केंद्र सरकारदेखील आपल्या पाठीशी उभा आहे. जेव्हा कधी शेतकऱ्यावर संटक आलं तेव्हा सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिलं आहे. आम्ही गेल्यावर्षीही अतिवृष्टी झाली तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलो होतो. मागच्यावेळीही बळीराजाची दिवाळी काळी होऊ दिली नाही. यावर्षीही होऊ देणार नाही, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
खचून न जाता, आपल्या परिवाराचा विचार करा. टोकाचा निर्णय करु नका. बँकवाल्यांना थांबवू. शेतकऱ्यांसाठी बारा कलमी कार्यक्रम राबवत आहे. शेतकऱ्यांवरचं संकट जिथे आहे तिथे सरकार आणि शिवसेना आहे, असं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. आता शिवसेनेने ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असं काही धोरण ठेवलेलं नाही. तर १०० टक्के समाजकारणच, असं म्हटलं आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे याच्यासोबत यावेळी मंचावर अनेक महायुतीचे नेते पाहायला मिळाले. परभणीचे खासदार संजय उर्फ जाधव यांच्या मतदारसंघातील अनेक शिवसैनिकांनी या कार्यकर्माला मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली.
