
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईला आज दुसरं विमानतळ मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. तसेच आज पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतील पहिली पूर्णपणे भूमिगत असलेली मेट्रो एक्वा लाईन-3 च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि नेते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे आणि मेट्रो एक्वा लाईन-3 च्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन झाले. नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा सुमारे 19650 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आला आहे. हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर वर्षाला 90 दशलक्ष प्रवासी हाताळू शणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांसाठी हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. या विमानतळामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे.
मुंबई मेट्रो लाईन-3 चा अंतिम टप्पा आजपासून मुंबईकरांसाठी खुला झाला आहे. हा टप्पा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड असा आहे. यामुळे गोरेगाव आरे ते कफ परेड असा संपूर्ण प्रवास मुंबईकरांना थेट करता येणार आहे. यापूर्वी मेट्रो-3 दोन टप्प्यांत म्हणजे आरे ते बीकेसी (BKC) आणि बीकेसी ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) अशी सुरु होती. आज अंतिम टप्प्याचे लोकार्पण झाले आहे. यात विज्ञान केंद्र (नेहरू सेंटर) ते कफ परेड पर्यंतच्या 11 स्थानकांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्यात विमानतळ आणि मेट्रोव्यतिरिक्त मुंबई वन नावाच्या एका एकात्मिक कॉमन मोबिलिटी ॲपचे आणि शॉर्ट-टर्म एम्प्लॉयबिलिटी प्रोग्राम (STEP) चे देखील लोकार्पण होणार आहेत. त्यानंतर उद्या ते ब्रिटीश पंतप्रधान सर किअर स्टारमर यांची मुंबईत भेट घेणार आहेत.