नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळच्या नावावरून वाद पेटला, दी बा पाटील यांच्या नावासाठी विरोधक आक्रमक
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण पार पडेल. ज्यामुळे मुंबई, पुणे, कोकण व्यापार-पर्यटनाला चालना मिळेल. १९,६५० कोटींच्या या प्रकल्पाच्या नामकरणावरून मात्र वाद सुरू आहे. लोकनेते दी बा पाटील यांच्या नावासाठी स्थानिकांची मागणी असून, रोहित पवारांनी सरकारवर टीका केली आहे. अतुल पाटील यांनी नामकरणावर विश्वास व्यक्त करत, नाव न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आज दुपारी हा सोहळा पार पडणार आहे. देशातील सर्वात मोठ्या पायाभूत प्रकल्पांपैकी एक असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भव्य उद्घाटन सोहळा आज पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 3.30 च्या सुमारास या विमानतळाचे लोकार्पण करतील. १९,६५० कोटी रुपयांच्या खर्चाने बांधलेला हा अत्याधुनिक विमानतळ मुंबई, पुणे आणि कोकण परिसरातील व्यापार व पर्यटनाला मोठी चालना देईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मात्र हे विमानतळ सुरू होण्यापूर्वीच याच्या नावाचा वाद रंगला आहे. या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दी बा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी आहे. या नामांकनासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून संघर्ष सुरू होता. अखेर आज लोकनेते दी बा पाटील अंतरराष्ट्रीय विमानतळ अश्या नावाचा नामफकल लावण्यात आला आहे , राज्य सरकारने या नावाला हिरवा कंदील दिला असला तरी केंद्राची परवानगी मिळणं अजून बाकी आहे.
रोहित पवारांची टीका
याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. X (पूर्वीच ट्विटर) वर त्यांनी यासंदर्भात एक पोस्ट लिहीली आहे. “नवी मुंबईच्या विमानतळाला स्व.दी बा पाटील साहेबांचे नाव देण्याची स्थानिक भूमिपुत्रांची आग्रही आणि तेवढीच भावनिक मागणी आहे, परंतु दुर्दैवाने या सरकारला अद्यापही स्थानिकांच्या भावना समजलेल्या दिसत नाहीत. आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी तरी आजच्या भाषणात स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना समजून घेत विमानतळाला स्व.दी बा पाटील साहेबांचे नाव देण्याची अधिकृत घोषणा करावी.” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
नवी मुंबईच्या विमानतळाला स्व.दी बा पाटील साहेबांचे नाव देण्याची स्थानिक भूमिपुत्रांची आग्रही आणि तेवढीच भावनिक मागणी आहे, परंतु दुर्दैवाने या सरकारला अद्यापही स्थानिकांच्या भावना समजलेल्या दिसत नाहीत.
आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी तरी आजच्या भाषणात स्थानिक भूमिपुत्रांच्या… pic.twitter.com/PSsDckEcjC
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 8, 2025
तर आम्ही आंदोलन करू
दरम्यान दिबा पाटील यांचे सुपुत्र, अतुल दिबा पाटील यांनीही या संपूर्ण विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. “नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव मिळेल याचा मला विश्वास आहे” असं अतुल पाटील म्हणाले. ” आज नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होत आहे. या उद्घाटनचं निमंत्रण मलाही आलं असून मी तिथे उपस्थित राहणार आहे . नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव मिळेल असा मला वैयक्तिक विश्वास वाटतो. कारण मी अनेक वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री नागरी उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ यांन भेटलो आहे. आम्ही विमानतळाला नाव देणार, फक्त ती प्रोसेस असते ती झाल्यावर नाव मिळेल, असं त्यांनी सांगितल्याचं अतुल पाटील यांनी नमूद केलं.
विमानतळाला दीबा पाटील यांचे नाव मिळालं पाहिजे म्हणून आम्ही सातत्याने या गोष्टीचा पाठपुराव करत आहत. आज जे बोर्ड नवी मुंबई विमानतळाच्या नावाने लावले जात आहेत, त्यासंदर्भात आम्ही 3 ऑक्टोबर च्या सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित केला होता. त्या बैठकीत त्यांनी सांगितल की दिबा पाटील यांचं नाव ज्यावेळेस देण्यात येणार तेव्हा हे सगळे बोर्ड हटवण्यात येतील, हे नाव तात्पुरता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, असंही पाटील म्हणाले.
जर नवी मुंबई विमानतळाला दीबा पाटील यांचं नाव देण्यात आलं नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला. आज लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. त्यांच्या स्वागताचा मान मला आहे, पण मी या भेटीत त्यांच्याकडे ही मागणी करणार नाही, कारण ते प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे . पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विमानतळाच्या उद्घाटनाच्या भाषणावेळी दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला देण्यात यावं अशी मागणी करतील असं मला वाटत आहे . त्यांची ही मागणी पूर्ण देखील होईल कारण या जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींकडून ही मागणी करण्यात येत आहे, दिबा पाटील यांचा त्याग या लोकप्रतिनिधी लोकांना माहीत आहे असं अतुल पाटील म्हणाले.
