पुण्यातून निवडणूक लढवणार का? देवेंद्र फडणवीस यांनी दिलं एका वाक्यात उत्तर

Devendra Fadnavis : आज पुणे महापालिकेच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री गिरिजा ओक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यात त्यांनी पुण्यातून निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारला होता. यावर फडणवीस काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

पुण्यातून निवडणूक लढवणार का? देवेंद्र फडणवीस यांनी दिलं एका वाक्यात उत्तर
Fadnavis on Pune Election
Image Credit source: X
| Updated on: Jan 11, 2026 | 10:31 PM

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. आज पुणे महापालिकेच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री गिरिजा ओक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील प्रश्नांवर भाष्य केले. पुण्यात आगामी काळात सरकार काय उपाययोजना राबवणार याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी पुणे हे माझे आवडते शहर असल्याचे म्हटले आहे.

पुण्यातून निवडणूक लढवणार का?

या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘इथे चंद्रकांत दादा आहेत. मुरली अण्णा बसले आहेत. आमचं बरं चाललंय. म्हणून फक्त पुण्यावर प्रेमच ठेवणं योग्य. नागपूरकरांचं आमच्यावर प्रेम आहे. आम्ही सहावेळा निवडून आलो आहे. पण पुणे हे माझं अत्यंत आवडतं शहर आहे.’

पुण्यात 23 नवीन उड्डाण पुल सुरू करणार

पुण्याच्या विकासाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यात 23 नवीन उड्डाण पुल सुरू करणार आहोत. 8 चं काम सुरू झालं आहे. 15 चं काम येत्या तीन महिन्यात सुरू होईल. 20 ते 25 वर्ष तोडावे लागणार नाही असे उड्डाण पूल तयार करणार आहोत. पुण्यात खाली जागा उरली नाही, वरतीही जागा नाही. त्यामुळे पुण्यात पाताल लोक तयार करणार आहे. टनेल सेक तयार करणार आहोत. त्या टनेलचं कंम्पिलट प्लानिंग केलं आहे. 54 किलोमीटरचे टनेल तयार करणार आहोत. येरवडापासून ते कात्रजपर्यंत, पाषाण कोथरूड, औंध संगमवाडी टनेल तयार करणार आहोत. 32 हजार कोटी रुपये लागणार आहे. त्याचं प्लानिंग तयार केलं आहे.

मोफत प्रवासावर भाष्य

पुण्यात अजित पवारांनी महिलांना मेट्रोतून फुकट प्रवास करण्याची घोषणा केली. याबाबतच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातून उड्डाण करणाऱ्या महिलांना विमानातून मोफत प्रवास करता येईल. (मिश्कीलपणे) अनाऊन्स करायला काय जातं. घोषणाच करायची ना. आपण अजेंडा तयार करतो. काहीही आश्वासन देतो. पण ते पटलं पाहिजे ना. मेट्रो ही काय एकट्या पुण्याची नाही. केंद्र आणि राज्य सरकारचीही आहे. फेयर सिस्टिम तिकीटाचे दर ठरवते. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याची आश्वासने का द्यायची. पुणेकरांना मोफत नको. रिलायबल आणि डिपेंडेबल हवे आहे. त्यांना उत्तम सेवा हवी आहे. ही सेवा चांगली झाली पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे. हे आश्वासन पुणेकरांनी समजलं आहे.’