पूजा खेडकरांच्या आईचा आणखी एक व्हिडीओ समोर, मेट्रो कर्मचाऱ्यांसह पोलिसांशीही घातली हुज्जत
मनोरमा खेडकर यांचा हा व्हिडीओ 2022 मधील असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने पुरावा म्हणून हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता.

Manorama Khedkar Fighting Video : प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर प्रकरणी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सध्या पूजा खेडकर यांची चौकशी सुरु आहे. त्यात आता दुसरीकडे त्यांची आई मनोरमा खेडकर यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत मनोरमा खेडकर या मेट्रो अधिकारी आणि पोलिसांसोबत हुज्जत घालताना दिसत आहे.
पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मनोरमा खेडकर या मेट्रो अधिकारी आणि पोलिसांशी मोठमोठ्या आवाजात वाद घालताना दिसत आहेत. यावेळी त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूला रस्त्यावर लोक जमा झाल्याचेही दिसत आहेत. मनोरमा खेडकर यांचा हा व्हिडीओ 2022 मधील असल्याचे सांगितले जात आहे. पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने पुरावा म्हणून हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता.
मेट्रो कर्मचाऱ्यांसह पोलिसांशीही घातली हुज्जत
पुण्यातील बाणेर रस्त्यावर खेडकर कुटुंबाचा ओम दीप नावाचा बंगला आहे. या बंगल्याच्या समोर गेल्या काही काळापासून मेट्रोचे काम सुरू आहे. या कामासाठी असलेले साहित्य मेट्रो कर्मचाऱ्यांनी खेडकर यांच्या बंगल्यासमोरील फुटपाथवर ठेवले होते. त्यावरुन मनोरमा खेडकर यांनी मेट्रो कर्मचाऱ्यांसोबत वाद सुरु केला. यानंतर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती चतुःश्रृंगी पोलिसांना दिली होती. ही माहिती दिल्यानंतर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील कर्मचारी तिथे पोहोचले. पण मनोरमा खेडकर यांनी पोलिसांसोबतही हुज्जत घालायला सुरुवात केली. सध्या या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मनोरमा खेडकर फरार
दरम्यान याआधीही मनोरमा खेडकर यांचा हातात पिस्तुल घेतलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मनोरमा खेडकर यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या फरार झाल्या आहेत. पोलिसांचं एक पथक मनोरमा यांचा शोध घेत आहे. मनोरमा यांचा फोनही बंद असल्याने त्यांचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेची पथके खेडकर यांचा शोध घेत आहेत. शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी घराला कुलूप असल्याने फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोनही लागत नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. तसेच खेडकर कुटुंबाच्या पुणे आणि आजूबाजूला असणाऱ्या फार्म हाऊसवर देखील पुणे पोलिसांनी घेतला शोध आहे.
