चक्रीवादळाने कागदावरील नुकसानीपेक्षा जास्त नुकसान, अनेक ठिकाणी प्रशासन अजूनही पोहोचलेलं नाही : प्राजक्त तनपुरे

चक्रीवादळाने कागदावरील नुकसानीपेक्षा जास्त नुकसान, अनेक ठिकाणी प्रशासन अजूनही पोहोचलेलं नाही : प्राजक्त तनपुरे

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे (Prajakt Tanpure on Cyclone Damage). याच पार्श्वभूमीवर मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रायगडच्या नुकसानीची पाहणी केली.

चेतन पाटील

|

Jun 05, 2020 | 6:31 PM

रायगड : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे (Prajakt Tanpure on Cyclone Damage). याच पार्श्वभूमीवर मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रायगडच्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी अलिबागला शेतकऱ्यांच्या बांधावर जावून आढावा घेतला. यावेळी “कागदावरील नुकसानीपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. अनेक भागांमध्ये प्रशासन अजूनही पोहोचलेलं नाही”, असं मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले (Prajakt Tanpure on Cyclone Damage).

“वीज पुरवठा सुरळीत करण्याचं मोठं आव्हान आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी इतर जिल्ह्यांतून अधिकारी नियुक्त केले आहेत. त्याचबरोबर यासाठी मनुष्यबळही पाठवण्यात आले आहेत. तीन दिवसात बहुतांश भागातील पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे”, असं प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं.

“रायगडाला वादळाचे रौद्र रुप पाहायला मिळालं. फळबाग, शेती आणि विजेचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यावर भर आहे. बाहेरच्या जिल्ह्यातील अधिकारी नियुक्त केले आहेत. त्याचबरोबर बाहेरचे ठेकेदार इथे पाठवणार आहोत. वीज पुरवठा सुरळीत झाल्यावर इतर कामांना गती येईल”, असं देखील तनपुरे म्हणाले.

“दोन-तीन दिवसांमध्ये नुकसानीचे चित्र स्पष्ट होईल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीपेक्षा ग्राऊंडवरची आकडेवारी भयंकर आहे. काही भागांमध्ये प्रशासन अजून पोहोचलंसुद्धा नाही”, असं तनपुरे यांनी सांगितलं.

“मुख्यमंत्र्यांनी त्वरित कामांसाठी आपात्कालीन व्यवस्थापनासाठी 100 कोटी रुपये दिले आहेत. तर नेहमीच्या प्रचलित पद्धतीपेक्षा जास्त पॅकेजची मागणी लोकप्रतिनिधींची आहे. संपूर्ण नुकसानीच्या आढावानंतर योग्य विचार करुन मदत केली जाईल”, असेही तनपुरे यांनी सांगितलं.

“पंचनाम्यासाठी नुकसानीचा फोटो ग्राह्य धरण्याचा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या आहेत. त्यानुसार हे काम सुरु होईल”, असंही राज्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांकडून 100 कोटींची मदत जाहीर, पण सुनील तटकरेंकडून 5 हजार कोटींची मागणी

दरम्यान, चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्याची पाहणी केली. त्यांनी रायगड जिल्ह्यासाठी 100 कोटींची मदत जाहीर केली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्त भागासाठी 5 हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी केली आहे.

“निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालं आहे. माझ्या प्राथमिक अंदाजानुसार कोकणात साधारणत: 5 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. यामध्ये सार्वजनिक आणि शासकीय मालमत्तेचा समावेश आहे. माझी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हीच मागणी राहणार आहे की, नियमित आणि प्रचलित नियम बाजूला ठेवून आपत्तीग्रस्तांना मदतीचं धोरण ठेवलं पाहिजे”, असं सुनील तटकरे म्हणाले आहेत.

संबंधित बातमी :

कोकणात 5 हजार कोटींचं नुकसान, सरकारने पंचनाम्याआधी तातडीने 500 कोटींची मदत करावी : सुनील तटकरे

रायगडकरांना दिलासा देण्यासाठी आलो आहे, तातडीने 100 कोटी जाहीर : उद्धव ठाकरे

PHOTO | चक्रीवादळाचा रायगडला फटका, मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें