Nashik| सत्कार मागून मिळत नसतो, ठाले-पाटलांचे लिंबाळेंना प्रत्युत्तर; पुरस्कार मिळालेली पुस्तके चांगली असतातच असे नाही, असा टोला

'सत्कार मागून मिळत नसतो. तो सन्मानाने मिळत असतो. आम्ही कुणीही जात पात मानत नाही,' असे म्हणत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी शुक्रवारी साहित्य संमलेनाच्या उद्घाटन कार्यक्रमातच ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

Nashik| सत्कार मागून मिळत नसतो, ठाले-पाटलांचे लिंबाळेंना प्रत्युत्तर; पुरस्कार मिळालेली पुस्तके चांगली असतातच असे नाही, असा टोला
शरणकुमार लिंबाळे आणि कौतिकराव ठाले-पाटील.

कुसुमाग्रजनगरी, नाशिकः ‘सत्कार मागून मिळत नसतो. तो सन्मानाने मिळत असतो. आम्ही कुणीही जात पात मानत नाही,’ असे म्हणत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी शुक्रवारी साहित्य संमलेनाच्या उद्घाटन कार्यक्रमातच ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘ज्यांना पुरस्कार मिळतात, त्यांची पुस्तके चांगली असतातच असे नाही,’ असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. यापूर्वी शरणकुमार लिंबाळे यांनी सत्कारावरून साहित्य महामंडळावर जोरदार टीका केली होती. त्याचा समाचार आज कौतिकरावांनी आपल्या भाषणातून घेतला आणि सारेच क्षणभर अवाक झाले.

नेमके प्रकरण काय?

ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला 2020 या वर्षीचा मानाचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. 15 लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मात्र, तरीही नाशिक येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाचे साधे निमंत्रणही त्यांना मिळालेले नव्हते. यावर लिंबाळे यांनी ‘मी नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात २५ वर्षे होतो. याआधी नाशिकला संमेलन झाले, त्याही वेळी मला निमंत्रण नव्हते. यंदाही निमंत्रण नाही. संमेलन विशिष्ट गट, कंपूपुरते मर्यादित राहिले आहे. संमेलन सर्वसमावेशक झाले पाहिजे.’ अशी टीका केली होती. सोबतच ‘ज्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळालेली आहे, भाषा आणि साहित्यासाठी ज्यांनी योगदान दिले आहे, त्यांनाही संमेलनात स्थान मिळाले पाहिजे. लोकांच्या पैशातून केवळ जवळच्या व्यक्तींचा सन्मान करून, त्यांना उपकृत करणे योग्य नाही. सरस्वती सन्मान नाकारणाऱ्यांचा उदो उदो होतो आणि पुरस्कार स्वीकारणाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते,’ असा आरोपही केला होता. विशेष म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या पत्नी अनुराधा पाटील यांचा संमेलनात सत्कार करण्यात आला होता. लिंबाळे यांच्या या आरोपाला या साऱ्या प्रकरणाचा संदर्भ होता.

तुमच्यावर पुरवणी का काढली नाही?

साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांनी केलेल्या या आरोपाचा कौतिकराव ठाले-पाटील यांनी आपल्या भाषणातून समाचार घेतला. ते म्हणाले, ‘आम्ही जात-पात मानत नाही. आमच्या आणि स्वागतमंडळाच्या मनात तसं काहीही नाही. अशी वादळे निर्माण करणे, अडथळे निर्माण करणे योग्य नाही. सत्कार मागून मिळत नसतो. सन्मानाने मिळत असतो. ज्यांना पुरस्कार मिळतात त्यांची पुस्तके वाचण्यासाठी असतातच असे नाही, अशी जोरदार टीका यावेळी कौतिकरावांनी केली. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी शरणकुमार लिंबाळे यांचे नावही घेतले. ‘ज्यांना यापूर्वी पुरस्कार मिळाले, त्यांच्यावर वर्तमान पत्रांनी पानपान मजकूर लिहिला. महेश एलकुंचवार, भालचंद्र नेमाडे यांच्यावर अनेकांनी पुरवण्या काढल्या. तुम्हाला पुरस्कार मिळाल्यानंतर कोणत्या वर्तमानपत्राने पुरवणी का काढली नाही,’ अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली. आता यावर लिंबाळे काय उत्तर देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

हिंडता-फिरता अध्यक्ष निवडायला हवा

कौतिकराव म्हणाले की, ’93 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची साहित्य संमेलनापूर्वी प्रकृती बिघडली. ते व्हीलचेअरवर बसून संमेलनाला आहे. तशा स्थितीत पन्नासेक मिनिटे आमच्या सोबत घालवली. आता आता 94 व्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचीही तब्येत ठिक नाही. त्यामुळे त्यांना उपस्थित राहिता आले नाही. खरे तर साहित्य महामंडळाने अध्यक्ष निवडीसाठी घटना दुरुस्ती केली. आता पुन्हा एकदा आम्हाला घटना दुरुस्ती करावे लागते काय किंवा यापुढे आम्हाला चालता-फिरता अध्यक्ष निवडायला हवा,’ अशी टोलेबाजीही त्यांनी यावेळी केली.


इतर बातम्याः

Special News| साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नारळीकर यांचे अनकट अन् डोळ्यांत अंजन घालणारे स्फोटक भाषण…!

केंद्राविरोधात राज्याचा शड्डू, मंत्री देसाईंची घोषणा; मराठीच्या अभिजाततेसाठी जनतेच्या न्यायालयात लढा, राष्ट्रपतींकडे याचिका

Published On - 9:09 pm, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI