सनातन टेरर.. माजी मुख्यमंत्र्याच्या विधानावरून शिवसैनिक भडकले, काँग्रेस कार्यालयावर संतप्त मोर्चा
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या "हिंदू दहशतवाद" या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारणात तीव्र वाद निर्माण झाला आहे. शिवसेना शिंदे गटाने चव्हाण यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. दादरमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. ठाण्यातही युवा सेनेने आंदोलन केले. चव्हाण यांच्या वक्तव्याला तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच पेटलेलं दिसत आहे. हिंदू टेरर, सनातन टेरर असे संताप जनक वक्तव्य काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने चांगलीच खळबळ माजली आहे, चव्हाण यांच्या या विधानानंतर शिवसेना शिंदे गट संतापला असून चांगलाच आक्रमक झाला आहे. आणि त्याचविरोधात आज शिंदेच्या शिवसेनेने उग्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आज दादर येथे शिवसेना शिंदे गटाचे आंदोलन सुरू असून शायना एन सी, मनिषा कायंदे आणि शीतल म्हात्रे यांच्यासह असंख्य शिवसैनिक रस्त्यावर उतरले.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात जोरदार घोषणा देत आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. शिवसैनिकांचा हा मोर्चा टिळक भवनाबाहेर पोहोचला असून त्यांना अडवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभमूवर टिळक भवनाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
ठाण्यातही युवा सेना आक्रमक
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ठाण्यातही युवा सेना आक्रमक झाली. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि युवा सेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात ठाण्यातील आनंद आश्रम बाहेर आंदोलन करण्यात आलं. “गर्व से कहो हम हिंदू है” असे फलक यूवा सैनिकांच्या हातात फलक झळकत होते.
शायना एनसी यांची सडकून टीका
काल पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद नव्हे तर सनातन दहशतवाद म्हणा असे म्हटले होते. याच विधानावरून आज शिंदेच्या शिवसेनेचे उग्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान “महाविनाश आघाडी फक्त तुष्टीकरणाचं राजकारण करतात, हिंदूचा अपमान करणं हेचं त्यांच्या DNA मध्ये आहे” अशी टीका शायना एनसी यांनी केली आहे.
चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यात शिवसेनेतर्फे निषेध आंदोलन, पोस्टरला मारले जोडे
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आज जालन्यामध्ये शिवसैनिकांनी त्यांच्या फोटोला जोडे मारत निषेध आंदोलन केलं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी त्यांचा निषेध केला. दरम्यान पुढील काळात पृथ्वीराज चव्हाण जालन्याला आले तर त्यांच्या तोंडाला काळं फासू, असा आक्रमक इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य काय ?
भाजपच्या लोकांना किंवा काँग्रेसच्या लोकांनाही माझी नम्रपणे विनंती आहे की कृपया भगवा शब्दाचा वापर करू नका. महाराष्ट्रामध्ये आमच्याकरता भगवा हा पवित्र शब्द आहे, ते स्वातंत्र्यलढ्याचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्याचा हा ( भगवा) ध्वज आहे. भगवा रंग हा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि वारकरी पंथाचा रंग आहे, तो महाराष्ट्राला प्रिय आहे. त्याला कोणीही राजकीय लेबल कृपा करून देऊ नका. म्हणायचं असेल तर सनातनी म्हणा, हिंदुत्ववादी म्हणा पण भगवा म्हण नका अशी माझी विनंती आहे असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
