Ravindra Dhangekar : चंद्रकांत दादांच्या ॲाफिसात मोक्कातील आरोपी, धंगेकरांचा नवा बॉम्ब, राजकीय वर्तुळात खळबळ
कुख्यात गुंड निलेश घायवळच्या पलायनामुळे पुण्यात राजकीय वाद पेटला आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी चौकशीची मागणी केली. तर रवींद्र धंगेकरांनी प्रवीण दरेकरांवर पलटवार करत चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप केले. पाटलांच्या कार्यालयात मोक्काचा आरोपी काम करत असून ते गुन्हेगारी चालवतात, असा दावा करत पुणे पोलिसांच्या तपासाची मागणी धंगेकरांनी केली आहे.

कुख्यात गुंड निलेश घायवळ हा सध्या फरार असून तो परदेशात गेल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या हातावर तुरू देऊन, बनावट पासपोर्ट बनवून तो परदेशात गेला असून त्याच्याभोवती पोलिस कारवाईचा फास आवळत आहेत. मात्र त्याच्या देशातून पलायनामुळे राजकारण चांगलचं तापलं असून विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. निलेश घायवळला कोणी मदत केली याची चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. घायवळला क्लिअरन्स सर्टिफिकेट कोणी दिलं याचीही पडताळणी करावी असं त्यांनी म्हटलं. तर तपास करावा काडतुसं नाही, जिवंत माणसं गाडलेली सापडतील असं शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं.
मात्र त्यांच्या या विधानानंतर प्रवीण दरेकरांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ” धंगेकर आमदार नाहीत, प्रसिद्धीसाठी चर्चेत रहावं लागतं ” असं प्रवीण दरेकर म्हणाले. धंगेकरांकडे आरोप करून चर्चेत राहण्यापलीकडे काम नाही असा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या या टीकेला धंगेकर यांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. ” दरेकर पुण्यात राहत नाहीत, त्यांना पुणेकरांच्या व्यथा माहीत नाहीत. एकदा मी त्यांना पुण्यात बोलावणार आहे, सर्वसामान्य जनता काय म्हणते हे त्यांना ऐकवणार आहे ” असा पलटवरा धंगेकर यांनी केला.
रविंद्र धंगेकर यांनी फोडला ब़ॉम्ब
याचदरम्यान बोलताना रविंद्र धंगेकर यांनी आणखी एक मोठा बॉम्बही फोडला. दरेकरांना मी एकदा पुण्यात बोलवणार आहे, सर्वसामान्य जनता काय म्हणते हे त्यांना ऐकवणार, पुणेकर म्हणून बोलायचा अधिकार मला लोकशाहीने दिला आहे. दरेकरांनी मी आमदार नाही म्हणून आहे, आपण कुठे होता कुठे गेला हे लोकांना माहित आहे . कोणाच्यातरी ताटाखालचे मांजर झाल्यावर आपल्याला पद मिळतात, हे दरेकरांना माहित आहे .
चंद्रकांत पाटलांना लाख-लाखाने लोकं निवडून देतात असे गुन्हेगार पळायला लोक परवानगी देतात का? चंद्रकांत पाटलांचा ऑफिसमध्ये समीर पाटील नावाचा कोणतरी व्यक्ती आहे, हा मोक्कातील आरोपी आहे, हा गुन्हेगारी चालवतो, हा पोलिसांवर दादागिरी करतो, चंद्रकांत दादा चा फोन वापरून पोलिसांच्या बदल्या करतो असा सनसनाटी आरोपही धंगेकर यांनी केला.
हा काळा डाग मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही लागेल
एवढंच नव्हे तर लोकांची नरडी कापणाऱ्यांना दादा पाठीशी घालतात. चंद्रकांत दादांनी वेळेत कोथरूड मधील गुन्हेगारी आवरली पाहिजे, चंद्रकांत दादांना निवडणुकीत गुंडांचा फायदा होतो मात्र ते पुण्याच्या हिताचं नाही. चंद्रकांत पाटील दहा वर्षे आमदार पुण्यातून झाले आणि त्यांनी पुणेकरांना गुन्हेगारी दिली. चंद्रकांत पाटलांनी हे पाप लवकर धवून टाकावी नाहीतर हा काळा डाग मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही लागेल, असंही धंगेकर म्हणाले. पोलिसांनी तपास करावा, जिवंत काडपूस नाही जिवंत माणसं गाडलेली सापडतील. कोणत्याही राजकारणाला यामध्ये हस्तक्षेप करून देऊ नये. पोलिसांना गोळ्या सापडल्यामुळे मुडदे देखील सापडतील असं विधान धंगेकर यांनी केलं असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.
