पुणे पोलिसांची मध्यप्रदेशात घुसून मोठी कारवाई, खतरनाक शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, तीन डझन आरोपींच्या मुसक्या आवळल्या
Pune Police : पुणे पोलीसांनी मध्य प्रदेशातील उमर्ती गावात असणारा बेकायदेशीर शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत 36 जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुणे पोलीसांनी मध्यप्रदेशात मोठी कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातील उमर्ती गावात असणारा बेकायदेशीर शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावर पुणे पोलिसांनी छापा टाकत तो उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत 36 जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली असून यात एकूण 4 कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पुणे आणि मध्यप्रदेश पोलीसांची एकत्रित कामगिरी
मध्य प्रदेशातील उमर्ती गावातील या कारवाईवर बोलताना सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी म्हटले की, पुणे पोलीसांकडून मध्य प्रदेशात ही कारवाई केली जात आहे. आपण कोम्बिंग ऑपरेशन राबवले आहे. विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये आणि काळेपडळ पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर पुणे पोलीस आणि मध्यप्रदेश पोलीसांनी एकत्र येत ही कारवाई केली आहे.
आरोपींवर गुन्हे दाखल होणार
सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा पुढे बोलताना म्हटले की, ‘आम्ही 50 ठिकाणी छातीमारी करत कारखाने उध्वस्त केले आहेत. एकूण 36 जणांना ताब्यात घेतल आहे. अनेक शस्त्रे जप्त केले आहेत. कोम्बिंग ऑपरेशन अजून सुरू आहे. अनेक कारखान्यावर छापेमारी करत सर्व कारखाने उध्वस्त केले आहेत. ही हत्यार पुरवणारी साखळी आहे ज्यांनी पुण्यात ही हत्यार पाठवली आहेत त्यांचा शोध सुरू आहे. अनेक लोक या रॅकेटमध्ये सहभागी आहेत सगळ्यांवर गुन्हे नोंद करण्यात येईल सगळ्यांना आरोपी करण्यात येईल.’
घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त
समोर आलेल्या माहितीनुसार या कारवाईत 100 पेक्षा अधिक बॅरल, 5 मॅगझिन, 14 ग्राइंडिंग मशीन, 2 पिस्तूल आणि 4 काडतुसे जप्त करण्यात आली. याशिवाय इतर महत्त्वाचे साचे, औजारे आणि उपकरणेही पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत. आता अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी करण्यात येणार असून या आरोपींनी पुण्यातील गुन्हेगारांनी शस्त्रे पुरवली का याचा शोध घेतला जाणार आहे. तसेच ही शस्त्रे कोणत्या गुन्हेगारांनी आणि किती प्रमाणात पुरविण्यात आली याबाबत चौकशी केली जाणार आहे.
