पुणे : ज्ञानवापी मशिदीसंदर्भात (Gyanvapi Masjid) चर्चा करत असताना धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पुण्यात भाजपा महिला नेत्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नवी दिल्लीतील भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्यावर पुण्यातील कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल गफुर अहमद पठाण (वय 47, रा. अशोका म्यूज, कोंढवा) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पठाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान नुपूर शर्मा यांनी धार्मिक भावना दुखावल्या असल्याची तक्रार पुणे पोलिसांत (Pune Police)देण्यात आली होती. ज्ञानवापी मशिदीसंदर्भात सध्या देशभर वादंग उठले आहे. काही धर्मांध शक्तींकडून हा वाद निर्माण केला जात आहे. अशावेळी कोणत्याही चर्चेत सहभागी होताना जबाबदारीचे भान ठेवायला हवे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये. मात्र ते ठेवले गेले नाही, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.