अजित पवार यांच्या आदेशानंतर पुण्यातील हिंजवडीत अतिक्रमणांवर बुलडोझर, अनधिकृत बांधकामांबाबत…
हिंजवडी, माण, मारुंजी भागातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएसह इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे. माण गावातील गट क्रमांक १६६ मधील ओढे - नाल्याभोवती असलेल्या २८ बांधकामांचे अतिक्रमण काढण्यात आले

आयटी नगरी म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील हिंजवडीसारखा भागात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. देशातील सर्वांत मोठ्या आयटी पार्कपैकी एक असलेले हिंजवडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पार्क विविध समस्यांमुळे चर्चेत आले आहे. पायाभूत सुविधांची दुरवस्था, रस्त्यांची खराब अवस्था, वाहतूक कोंडी, अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधा, पाणी व ड्रेनेज समस्यांमुळे या भागातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्यात थोडा पाऊस झाल्यावर हा भाग वॉटर पार्क होत आहे. त्यामुळे मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागास भेट दिली. त्यांनी त्या ठिकाणी असलेले अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच या बांधकामांना मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
अतिक्रमणांवर धडक कारवाई
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर प्रशासन कामाला लागले आहे. हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावले उचलली जात आहे. माण परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. बुधवारी हिंजवडी परिसरातील अतिक्रमणांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या भागातील अतिक्रमणासंदर्भात सर्वेक्षण सुरू असून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
२८ बांधकामांचे अतिक्रमण काढले
हिंजवडी, माण, मारुंजी भागातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएसह इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे. बुधवारी माण गावातील गट क्रमांक १६६ मधील ओढे – नाल्याभोवती असलेल्या २८ बांधकामांचे अतिक्रमण काढण्यात आले. यासह विप्रो सर्कल परिसरातील माऊली हॉटेलवरचे अतिक्रमणही काढले. संबंधित कारवाई पीएमआरडीए, एमआयडीसीसह इतर शासकीय यंत्रणाच्या माध्यमातून करण्यात आली.
अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण
पीएमआरडीएकडून मोहीम राबवली जात आहे. अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, या उद्देशाने अतिक्रमणधारकांचा सर्व्हे करण्यात येत असून त्यांना नोटीसा बजावण्यात येणार आहे. त्यामुळे हिंजवडीसह परिसरातील अतिक्रमणधारकांनी स्वत: आपली अतिक्रमणे काढून घेत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल झेंडे यांनी केले आहे.
अन् व्यापाऱ्यांकडून जागा मोकळी करण्यास सुरुवात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यास विरोध करणाऱ्यांना कारवाई करा. त्यांच्यावर 353 दाखल करा, असा इशारा गेल्या रविवारी केलेल्या पाहणीत दिला होता. अजित पवार यांच्या या इशाऱ्याचा परिणाम हिंजवडीमध्ये दिसू लागला आहे. पीएमआरडीएने कारवाई करण्यापूर्वीच हिंजवडीमधील वाहतूक कोंडी होणाऱ्या लक्ष्मी चौकात दुकानदारांनी साहित्य काढायला सुरुवात केली आहे. तीन दिवसांपूर्वी पीएमआरडीकडून या व्यापाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या होत्या. आज मात्र व्यापारी स्वतःहून आपली दुकानाची जागा मोकळी करत आहे.
