पुणे : बॉम्बसदृश वस्तू (Bomb like object) आढळल्याची घटना पुन्हा एकदा पुण्यात घडली आहे. हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द याठिकाणी हा प्रकार घडला आहे. अण्णासाहेब मगर कॉलेजच्या उजव्या बाजूला ही वस्तू आढळली. अभिमान गायकवाड या सजग नागरिकाच्या नजरेस ही वस्तू पडली. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस पाटील यांना याविषयीची माहिती दिली. पोलीस पाटील अंकुश उंद्रे, अशोक आव्हाळे यांनी मग लोणीकंद पोलिसांशी (Lonikand Police) संपर्क साधला. लोणीकंद पोलीस स्टेशनचे पीआय गजानन पवार यांना याविषयीची सविस्तर माहिती दिली. मांजरी खुर्द याठिकाणी पोलिसांचे पथक तसेच बॉम्ब शोधक पथक दाखल झाले. या तपासणीत त्याठिकाणी जुना ग्रेनेड (Grenade) आढळून आला आहे. सात-आठ वर्षांपूर्वी या ठिकाणी याठिकाणी भराव टाकण्यात आला होता. तोच आता वर आला आहे, असे प्रथमदर्शनी दिसत आहे.