VIDEO: “मी भुजबळ यांच्या विरोधात नाही, कुणाला वाईट वाटले असेल तर माफी मागतो”

भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोणावळा येथील ओबीसी चिंतन बैठकीत राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या आरोपांना उत्तर दिलंय.

VIDEO: "मी भुजबळ यांच्या विरोधात नाही, कुणाला वाईट वाटले असेल तर माफी मागतो"


पुणे : भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोणावळा येथील ओबीसी चिंतन बैठकीत राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या आरोपांना उत्तर दिलंय. यानंतर भुजबळ समर्थकांनी आक्षेप घेत गोंधळ करण्याचा प्रयत्न करताच मी भुजबळ यांच्या विरोधात नाही, कुणाला वाईट वाटलं असेल तर माफी मागतो, असं मत व्यक्त केलं. छगन भुजबळ यांनी चंद्रकांत बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणासाठीचा अध्यादेश रद्द केल्याची मागणी केल्याचा आरोप केला होता. यावरुन दुखावलेल्या बावनकुळे यांनी लोणावळ्यात त्यांच्याच मंचावर येऊन आपली नाराजी व्यक्त केली (Chandrashekhar Bavankule criticize Chhagan Bhujbal for allegation about OBC reservation ordinance claim).

“भुजबळांनी वटहुकुम रद्द होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं”

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “मी छगन भुजबळ यांना भेटून 31 जुलै रोजी काढलेला वटहुकुम (अध्यादेश) 31 जानेवारीला संपेल असं सांगितलं. कारण 6 महिन्याच्या वर वटहुकुम चालत नाही. या अध्यादेशाचं रुपांतर कायद्यात करावं लागतं. तसं झालं नाही तर तो रद्द होतो. भुजबळांनी आमचं म्हणणं 15 मिनिटं ऐकून घेतलं. तसेच तो वटहुकुम रद्द होऊ देणार नाही, असं आश्वासन दिलं. मात्र, त्यांनी या मंचावरुन याबाबत वेगळी माहिती दिली.”

“मी वटहुकुम रद्द करायला सांगितला हा भुजबळांचा आरोप केविलवाणा”

“30 जुलै रोजीच्या रात्री जागून राज्यपालांची सही आणून वटहुकुम काढण्यापर्यंत या कार्यकर्त्याने काम केलं. त्याच्याबद्दल या मंचावर सांगण्यात आलं की बावनकुळे म्हणाले तो वटहुकुम रद्द करा. भुजबळांनी ओबीसींसाठी मोठं काम केलंय. ते वरिष्ठ नेते आहेत आणि सर्वांसाठी आदरणीय आहेत. पण त्यांना या वयात का खोटं बोलावं लागलं? त्यांना या मंचावर खोटं का बोलावं लागलं याची मला चिंता आहे. हा केविलवाणा प्रकार वाटला. यासाठी मी त्यांची माफी मागतो, कारण ते वरिष्ठ आहेत. पण मी त्यांच्या या आरोपाने दुखावलो गेलो,” असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

यानंतर भुजबळ समर्थकांनी गोंधळ केल्यानंतर बावनकुळे म्हणाले, “मी भुजबळांच्या विरोधात नाही. मी त्यांचा आदरच करतो. मी जेवढा भुजबळांचा आदर करतो तेवढा कोण करतो माहिती नाही.”

दरम्यान, याआधीही चंद्रशेखर बावनकुळे यांनी छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावरुन केलेल्या टीकेवर त्यांच्यावर हल्ला चढवला होता. “छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहे, मात्र मला दुःखानं सांगावं लागत की या वयात त्यांना खोटं बोलावं लागतं. 2018 ला जेव्हा ही केस सुरू झाली तेव्हा ते जेलमध्ये होते. या संपूर्ण केसची जबाबदारी फडणवीस यांनी मला दिली होती. मी रात्र रात्र बसून या अध्यादेशावर काम केलं आणि अध्यादेश तयार केला. त्यामुळे त्यांच्या या बोलण्यावर किंव येते की असं त्यांना का बोलावं लागलं,” असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं होतं.

“भूजबळ या वयात रेटून खोटं बोलत आहेत”

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “महाविकासआघाडीचं सरकार आलं तेव्हा आम्ही भुजबळ, वडेट्टीवार, नाना पटोले यांना भेटलो. त्यांना अध्यादेश लॅप्स होत आहे असं सांगितलं. त्यांनी तो कन्टिन्यू केला नाही. हे त्यांच्या अंगावर येत आहे. म्हणून ते आता असं बोलत फिरत आहेत. त्यांनी या वयात तरी खोटं बोलू नये. ते खोटं बोलत आहे आणि रेटून खोटं बोलत आहेत. ओबीसी आंदोलनात राजकारण आम्हाला करायचं नाही. चिंतन बैठक आहे असं सांगितलं, मात्र आता ती राजकीय बैठक ठरत आहे. मात्र मी त्यात जाणार आहे.”

छगन भूजबळ नेमकं काय म्हणाले होते?

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं म्हणून राज्य सरकार आणि ओबीसी संघटना लवकरच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत, असं भुजबळांनी नमूद केलं. केंद्र सरकारकडे ओबीसींच्या इंम्पेरीकल डाटाची मागणी आम्ही करतोय. भाजपचं आजचं आंदोलन राजकारणापोटी आहे. त्यांना दाखवायचं आहे की आम्ही ओबीसींसोबत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्त्व करावं आणि केंद्र सरकारकडे जाऊन इम्पेरिकल डाटा मागावा” असं भुजबळ म्हणाले.

गेल्या 15 महिन्यात कोरोनामुळे कुणी कुणाच्या घरी जाऊ शकत नव्हतं, म्हणून इंम्पेरिकल डाटा गोळा करणं शक्य झालं नाही. कोरोना संपेपर्यंत इंम्पेरिकल डेटा गोळा करणं शक्य नाही, असंही छगन भुजबळ म्हणाले.

बावनकुळे यांचा संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

माझा मराठा आरक्षणाला नेहमीच पाठिंबा, फक्त कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता ते द्या : छगन भुजबळ

“छगन भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये, तुम्ही त्यावेळी जेलमध्ये होता”

भुजबळांनी कोल्हापूरच्या बिंदू चौकात ओबीसी आरक्षणावर फडणवीसांसोबत जाहीर चर्चा करावी, चंद्रकांत पाटलांचं आव्हान

Chandrashekhar Bavankule criticize Chhagan Bhujbal for allegation about OBC reservation ordinance claim

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI