‘…तर पुण्यात स्वतंत्र निवडणूक लढवू’; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा, काही प्रभागांत राष्ट्रवादी-भाजपाची छुपी युती असल्याचाही आरोप

'...तर पुण्यात स्वतंत्र निवडणूक लढवू'; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा, काही प्रभागांत राष्ट्रवादी-भाजपाची छुपी युती असल्याचाही आरोप
शिवसेना नेते प्रमोद भानगिरे
Image Credit source: tv9

नवीन आलेले कार्यकर्ते बोलतात, की चंद्रकांत मोकाटे आता कधीच निवडून येणार नाही. मात्र यांना काय माहीत मतांसाठी किती फिरावे लागते आणि मते गोळा करावी लागतात ते, असे म्हणत कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी सचिन अहिर यांच्याकडे खदखद व्यक्त केली.

प्रदीप कापसे

| Edited By: प्रदीप गरड

May 29, 2022 | 4:49 PM

पुणे : एकीकडे राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना दुसरीकडे मात्र पुण्यात महापालिका प्रभाग रचनेवरून महाविकास आघाडीत नाराजीनाट्य रंगले आहे. राष्ट्रवादीने (NCP) आपल्या सोयीने प्रभाग रचना केली असून जाणूनबुजून सेनेच्या नगरसेवकांचे प्रभाग फोडल्याचा आरोप सेना नगरसेवक प्रमोद भानगिरे (Pramod Bhangire) यांनी केला आहे. शिवाय काही प्रभागात राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यात छुपी युती असल्याचा गंभीर आरोप भानगिरे यांनी केला. अशी जर परिस्थिती असेल तर आम्ही पुण्यात स्वतंत्र निवडणुका लढवणार, असा इशारा यावेळी सेनेने दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाने प्रभाग रचना हातात घेतली, हवी तशी प्रभाग रचना केली, असा आरोप शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर (Mahadeo Babar) यांनी केला आहे. शिवसेनेचा संपर्क मेळावा पुण्यात पार पडला, या कार्यक्रमात शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादीवर टीका करत आपली नाराजी व्यक्त केली.

‘आमचीही काळजी घ्या’

प्रभाग रचना करणे काम कोणाचे होते, यांच्या घरात प्रभागरचना कशी होते, असे सवाल करत आघाडी करताना आमचीही काळजी घ्या, असे बाबर म्हणाले. दरम्यान महादेव बाबर बोलत असताना एक माजी नगरसेवक सचिन भगत स्टेजवर आले आणि महादेव बाबर आमच्या मनातले बोलत आहेत, ही खदखद बोलून दाखवली. एकूणच प्रभागरचनेवरून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत.

‘आघाडीचा धर्म इतरांनीही पाळायला हवा’

शिवसेना नेते चंद्रकांत मोकाटेंनी यावेळी सचिन भगत यांची पाठराखण करत म्हटले, की सचिन भाऊ ही मनातली खदखद नाही तर तळतळ आहे. आपण आघाडी धर्म करताना आघाडीचा धर्म इतरांनीही पाळायला हवा. कारण प्रभागरचनेत आपण जेवढे लक्ष घालायला पाहिजे, तेवढे घातले नाही. कार्यकर्त्यांनी आपल्यावर अन्याय होत आहे, तर यावर बोलले पाहिजे. कारण किती दिवस सहन करणार, असा सवाल त्यांनी केला. याआधी शिवसेनेच्या प्रभागनिहाय बैठका होत नव्हत्या. आता होत आहेत, असे मोकाटे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

‘त्यांना काय माहीत मतांसाठी किती फिरावे लागते’

पुढे ते म्हणाले, की काल ज्यावेळी आमची मॅच होती तेव्हा आम्ही अंबादास दानवे आणि इतरांना खाली बसवले. कारण भाजपाची तगडी टीम होती मात्र आम्ही ती तीन ओव्हरमध्येच गुंडाळली. आता पुढची पिढी राजकारणात आली पाहिजे. नवीन आलेले कार्यकर्ते बोलतात, की चंद्रकांत मोकाटे आता कधीच निवडून येणार नाही. मात्र यांना काय माहीत मतांसाठी किती फिरावे लागते आणि मते गोळा करावी लागतात ते, असे म्हणत कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी सचिन अहिर यांच्याकडे खदखद व्यक्त केली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें