पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले जात आहेत. विशेष म्हणजे काही अनपेक्षित राजकीय घडामोडी देखील समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीतील चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आजारी असूनही सहभागी झाले. पण त्याचवेळी या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवारांची अनुपस्थिती बघायला मिळाल्याने विविध चर्चांना उधाण आलंय. अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या चर्चांनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना ‘अजित दादांची गॅरंटी नाही’ असं स्पष्ट विधान केलंय. त्यांच्या या विधानामुळे मनसे नेते गजानन काळे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत खळबळजनक दावा केलाय.