विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या; एका टॅटूमुळे लागला मारेकरी पतीचा शोध
विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून पतीने गर्भवती पत्नीची हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून बारामती–भिगवण रोडवरील मदनवाडी गावाच्या हद्दीत ओढ्याखाली फेकून दिला. याप्रकरणी पोलिसांनी 24 तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

इंदापूरच्या भिगवणमध्ये महिलेचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून ओढ्याखाली फेकल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी सुदर्शन उर्फ रविराजला 24 तासांत अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. बारामती–भिगवण रोडवरील मदनवाडी गावाच्या हद्दीत ओढ्याखाली गरोदर महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. मृत महिलेच्या डाव्या हातावर ‘रविराज’ नावाचा टॅटू आढळल्याने पोलिसांना संशय आला आणि या एका पुराव्यावरून अवघ्या 24 तासांत त्यांनी आरोपीचा छडा लावत हत्येचा उलगडा केला.
दीपाली सुदर्शन जाधव असं संबंधित महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती सुदर्शन उर्फ रविराज जाधवला अटक केली आहे. बुधवारी मदनवाडी इथं ओढ्याच्या पुलाखाली ब्लँकेटमध्ये काहीतरी बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्यांना ब्लँकेटमध्ये महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. तसंच महिलेल्या डोक्यावर वार झाल्याची खूण होती आणि तिच्या हातावर ‘रविराज’ नावाचा टॅटू होता.
या प्रकरणी आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिग गुन्हे शाखा, भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांची तीन पथकं तयार करण्यात आली. अधिक चौकशी केली असता संबंधित महिलेच्या पतीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार 14 ऑक्टोबर रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात नोंदवल्याचं समोर आलं. पतीला ताब्यात घेतल्यानंतर मृतदेह त्याच्या पत्नीचा असल्याची पुष्टी त्याने केली. परंतु चौकशीदरम्यान रविराजने नोंदवलेल्या जबाबात अनेक विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय आणखी बळावला. अखेर पोलिसांच्या सखोल चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी पती रविराज जाधवने पत्नी दीपालीवर विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेतला होता. याच संशयावरून 12 ऑक्टोबर रोजी लोखंडी वस्तूने तिच्या डोक्यावर वार केला. नंतर मृतदेह चादरीत गुंडाळून मदनवाडीत ओढ्याखाली फेकून दिला. पोलिसांकडे महिलेच्या हातावरील ‘रविराज’ नावाचा टॅटू एवढाच पुरावा होता. याच पुराव्याच्या आधारे त्यांनी 24 तासांत आरोपीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. रविराजला न्यायालयात दाखल केलं असता 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
