जे मुख्यमंत्र्यांना जमले ते अजित पवारांना का नाही? आधी ‘ग्यान’ दिले, नंतर त्यालाच हरताळ?

अजित पवार (Ajit Pawar) हे रोखठोक बोलणारे, प्रसंगी कडवटपणा घेतील पण मनात येईल तेच बोलतील अशी त्यांची प्रतिमा. त्यांच्या या स्वभावावर महाराष्ट्र प्रेमही करतो. पण त्यांनीच सकाळी जे लोकांना 'ग्यान' दिलं, त्याला दुपारी हरताळ फासल्याचं पुण्यात घडलं आहे.

जे मुख्यमंत्र्यांना जमले ते अजित पवारांना का नाही? आधी 'ग्यान' दिले, नंतर त्यालाच हरताळ?
Ajit pawar


मुंबई: अजित पवार हे रोखठोक बोलणारे, प्रसंगी कडवटपणा घेतील पण मनात येईल तेच बोलतील अशी त्यांची प्रतिमा. त्यांच्या या स्वभावावर महाराष्ट्र प्रेमही करतो. पण त्यांनीच सकाळी जे लोकांना ‘ग्यान’ दिलं, त्याला दुपारी हरताळ फासल्याचं पुण्यात घडलं आहे. त्याच्या उलटं मुंबईत घडलं. मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रमही ऑनलाईन करुन गर्दी टाळली तसच कोरोना काळात राजकारण बाजुला ठेवण्याचा सल्ला दिला. त्यामुळेच एरवी अजित पवारांच्या प्रेमात असलेली पब्लिकही मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं कौतूक करते आहे. एवढच नाही तर जे मुख्यमंत्र्यांना जमलं ते अजित पवारांना का नाही असा सवालही नेटकरी विचारत आहेत. (is Ajit Pawar has no moral right to urge people to follow Covid guidelines?, read analysis)

अजित पवार काय म्हणाले होते?

राज्यात ओबीसी नेते सक्रिय झालेले आहेत. अजित पवारांचे सहकारी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात ओबीसींच्या शिबिराची घोषणा केली आहे. त्यावर अजित पवार म्हणाले होते, पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाला(ओबीसींच्या) दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पण कोरोनाचा काळ आहे आणि प्रशासनानं दिलेल्या परवानगीनुसारच शिबिराला कार्यकर्त्यांना हजर राहता येईल. अजित पवार पुढं असही म्हणाले की, मंत्र्यांनी सार्वजनिक कार्यक्रमातल्या संख्येची दखल गंभीरपणे घ्यावी. खरं तर अजित पवारांचा वडेट्टीवारांना हा सुचक इशाराच होता.

अजित पवारांनी स्वत: काय केले?

ओबीसीच्या शिबिराला इशारा दिला खरा पण नंतर अजित पवार तो इशारा विसरुन गेले. लोकांना कोरोनाचे नियम पाळा म्हणून तंबी देणारे, रिपोर्टर बूम घेऊन समोर आले तर त्यावर सॅनिटायजर फवारणाऱ्या अजित पवारांनी शेकडोच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पुण्यातल्या कार्यालयाचं उदघाटन केलं. विशेष म्हणजे पुण्यात सार्जनिक कार्यक्रमाला फक्त 50 जणांच्या उपस्थितीची मर्यादा असताना अजित पवारांच्या ह्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होती. याबद्दल अजित पवारांना याच कार्यक्रमात दिलगिरी व्यक्त करण्याची वेळही आली. एवढच नाही तर कार्यक्रम आयोजीत करणाऱ्यांवर कारवाई करायला सांगतो असही वरुन म्हणाले. पण कार्यक्रम राष्ट्रवादीचा, अजित पवार नेते राष्ट्रवादीचे, गर्दी अजित पवारांमुळे झाली तर मग ते स्वत:वरही कारवाई करणार का असा सवालही सोशल मीडियावर विचारला जात आहे. एवढच नाही तर सामान्यांवर कारवाई करण्यासाठी प्रशासन जी तत्परता दाखवतं ती इथेही दाखवली जाईल का?

मुख्यमंत्र्यांनी काय केलं?

शिवसेनेनं काल वर्धापन दिन साजरा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कुठेही गर्दी न करण्याचं सातत्यानं सांगत आहेत. त्याची अंमलबजावणी त्यांनी कालही केली. त्यांनी ठरवलं असतं तर शिवसेना भवनला गर्दी जमवणं त्यांना अशक्य होतं का? पण तसं न करता शिवसेना पक्षप्रमुखांनी कार्यकर्त्यांना ऑनलाईन संबोधन केलं. याच संबोधनात त्यांनी कार्यकर्त्यांना कोरोनामुक्त होण्यासाठी गर्दी टाळण्याचं आवाहन केलं. एवढच नाही तर कोरोना काळात स्वबळाचा नारा दिला तर लोक जोड्यानं हाणतील असही ते म्हणाले. ह्या सर्व काळात राजकारण बाजुला ठेवा आणि गावं कोरोनामुक्त करा असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. काल दुपारनंतर अजित पवारांमुळे पुण्यात झालेली गर्दी सगळीकडे चर्चेत आलेली होती. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं संबोधन आणखी उठून दिसलं.

का अजित पवारांच्या कार्यक्रमातली गर्दी गंभीर आहे?

पहिली लाट असो की दुसरी, पुणे हे कोरोनाचा हॉटस्पॉट राहिलेला आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ही 10 लाख 38 हजार 982 एवढी झालेली आहे. म्यूकर मायकोसिसचा विळखा वेगळाच. पुण्यातल्या मृत्यूनं फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाला धडकी भरवलेली आहे. खास पुण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या उपाय योजना आखल्या गेल्या. प्रचंड नुकसान होत असतानाही व्यापाऱ्यांना दुकानं बंद ठेवावी लागली आहेत. असं सगळं असतानाही, कार्यकर्ते नाराज झाले असते म्हणून आलो असं म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उदघाटन केलं. गाडीतूनच तसच निघून जावं वाटलं असही ते म्हणाले. खरोखरच ते तसे निघून गेले असते तर कदाचित कार्यकर्त्यांना अशी पुन्हा गर्दी न करण्याचा धडा मिळाला असता. त्यातच पुण्याचं हित होतं. (is Ajit Pawar has no moral right to urge people to follow Covid guidelines?, read analysis)

संबंधित बातम्या:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, कोरोना नियमावली पायदळी तुडवली

‘ठाकरे संकटात सापडले की त्यांची गुणवत्ता उफाळून येते, शत्रूला अधिक घातक ठरतात’

भोकर नगरपरिषदेत निवडणुकीच्या हालचाली, अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला

(is Ajit Pawar has no moral right to urge people to follow Covid guidelines?, read analysis)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI