पुणे : पुण्याच्या जवळ असलेला सिंहगड किल्ला (Sinhagad fort) पर्यटनासाठी तीन दिवस बंद ठेवण्यात यावा, असे पत्र वन विभागाकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. पुण्यात सुरू असलेल्या पावसाचा अंदाज आणि पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या 9 किमीच्या मार्गाला दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे पुणे वनविभागाने (Pune forest department) जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना 16 जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती केली आहे. मागील महिन्यात दरड कोसळून एका ट्रेकरचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी, किल्ल्याला भेट देण्यास तात्पुरती बंदी आवश्यक आहे, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पुढील तीन दिवस पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट (Red alert) दिलेला आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी नेमका काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.