राम कृष्ण हरी, वाजली ना तुतारी! बारामती, भोरमधून सुप्रिया सुळेंना सर्वात मोठं लीड, सुनेत्रा पवारांना कुठे फटका?
लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. या निकालामध्ये सुप्रिया सुळे या दीड लाखांच्या लीडने निवडून आल्या होत्या. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची अटीतटीची लढत होणार असं वाटतं होतं. मात्र सुप्रिया सुळेंनी मोठा विजय मिळवला.

लोकासभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधील सर्वात हाय व्होल्टेज असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेने परत एकदा सुप्रिया सुळे यांनाच पसंती दिली. बारामतीकरांची लेकीला पसंती राहिली हे दिसून आलं, कारण सुप्रिया सुळे यांनी तब्बल दीडा लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये येणार सहा विधानसभा मतदारसंघांमधील आकडेवारी पाहिली तर पाच मतदारसंघात त्यांना लीड मिळालं आहे. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या बारामतीलही मतदान सुप्रिया सुळे यांना जास्त झालं आहे.
विधानसभा मतदारसंघ | सुप्रिया सुळे | सुनेत्रा पवार | लीड |
---|---|---|---|
दौंड | 92,064 | 65,727 | 26,337 |
इंदापूर | 1,14,020 | 88,069 | 25,951 |
बारामती | 143941 | 96,560 , | 47,381 |
पुरंदर | 1,25,948 | 90,667 | 35,281 |
भोर | 1,34,245 | 90,440 | 43,805 |
खडकवासला | 1,21,182 | 1,41,928 | 20,746 |
एकूण | 7,31,400 | 5,73,391 | 1,58,009 |
दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे राहुल कुल आमदार आहेत. या मतदारसंघातूनही सुप्रिया सुळेंना २६,३३७ चं लीड मिळालं, इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे आमदार असून त्या ठिकाणीही सुप्रिया सुळेंना २५, ९५१ मतांच लीड, अजित पवार यांचा स्वत:चा मतदार संघ असलेल्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना सर्वाधिक ४७,३८१ मतांच लीड मिळालं. पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप आमदार असून त्या ठिकाणीही ३५ हजार मतांचं लीड, भोर तालुक्यातही सुप्रिया सुळे यांना दुसरं सर्वाधिक ४३,८०५ लीड मिळालं. भोरमध्ये काँग्रसचे संग्राम थोपटे आमदार आहेत. खडकवासला येथे सुप्रिया सुळे यांना फटका बसला, या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना २०,७४६ मतांचं लीड मिळालं होतं. तर सुप्रिया सुळे यांना एकूण ७,३१,४०० तर सुनेत्रा पवार यांना एकूण ५,७३,३९१ मते मिळाली आहेत. सुप्रिया सुळे एकूण १, ५८, ००९ लीडने निवडून आल्या.
अजित पवार आणि शरद पवार या काका-पुतण्यांनी आपली पूर्ण ताकद लावली होती. जनतेने सुप्रिया सुळे यांना कौल दिला. अजित पवारासांठी धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या पाच जागांवरील फक्त एकाच जागेवर त्यांना विजय मिळवता आला. रायगडमध्ये सुनील तटकरे यांनी विजय मिळवला तर शिरूरमध्ये उभे असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचाही पराभव झाला. त्यासोबतच अर्चना पाटील आणि महादेव जानकर यांचाही पराभव झाला.
दरम्यान, 2019 साली अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार मावळ मतदारसंघातून उभा राहिला होता. मात्र तेव्हा पार्थ पवार यांचाही पराभव झाला होता. यंदा पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्याने अजित पवारांचा घरातील दुसरा मोठा पराभव आहे.