VIDEO | बस ड्रायव्हरला फीट, प्रवासी महिलेने स्टेअरिंग सांभाळलं, पुण्यातील रणरागिणीच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक

40 वर्षीय चालकाला ड्रायव्हिंग करताना चक्कर आल्यानंतर बसमधील महिलेनेच स्टिअरिंग व्हिल हातात घेत बस चालवली आणि चालकाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं. जवळपास 10 किलोमीटर पर्यंतचा प्रवास त्यांनी केला.

VIDEO | बस ड्रायव्हरला फीट, प्रवासी महिलेने स्टेअरिंग सांभाळलं, पुण्यातील रणरागिणीच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक
पुण्यात महिलेच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

पुणे : संसाराचा रथ यशस्वीपणे हाकणाऱ्या महिलांच्या हाती कारचं स्टिअरिंग येऊनही जमाना झाला. महिलांच्या ड्राईव्हिंग स्किल्सबद्दल केले जाणारे बाष्फळ विनोद दुर्लक्षित केले, तर अनेक जणी नियमितपणे उत्तम कार चालवत असल्याचं सगळ्यांनीच पाहिलं आहे. अशातच पुण्यातील एक महिला बस चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Pune Lady Driving Bus) व्हायरल झाला. तुम्ही म्हणाल यात नवल ते काय? तर नवल आहे या माऊलीने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं. महिलांचा ग्रुप पर्यटन करत असताना बस चालकाला अचानक फिट आली. अशा वेळी योगिता सातव (Yogita Satav) यांनी धीराने बसचे स्टिअरिंग हाती घेतले आणि अनियंत्रित होऊ शकणारी बस तर ताब्यात घेतलीच, शिवाय बस चालकालाही रुग्णालयात दाखल केले.

नेमकं काय घडलं?

40 वर्षीय चालकाला ड्रायव्हिंग करताना चक्कर आल्यानंतर बसमधील महिलेनेच स्टिअरिंग व्हिल हातात घेत बस चालवली आणि चालकाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं. जवळपास 10 किलोमीटर पर्यंतचा प्रवास त्यांनी केला. वाघोली येथील योगिता सातव यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे चालकासह प्रवासी महिलांचेही प्राण वाचले.

बस चालकाला फीट

वाघोली येथील महिलांचा ग्रुप बसने मोराची चिंचोळी येथे पर्यटनासाठी निघाला होता. यावेळी बस ड्रायव्हरला गाडी चालवत असताना फिट येत असल्याचं आयोजक महिलेच्या लक्षात आलं. त्यांच्या सूचनेनुसार चालकाने गाडी बाजुला थांबवली आणि तो अक्षरशः कोसळलाच. अशा परिस्थिती गाडी कोण चालवणार, हा मोठा प्रश्न सर्व महिलांसमोर होता.

बस चालवण्याचा पहिलाच अनुभव

या प्रसंगात पर्यटनासाठी असणाऱ्या योगिता सातव यांनी क्षणाचाही विलंब न करता बसचे स्टिअरिंग स्वतःच्या हातात घेतले. योगिता यांना कार चालवण्याचा अनुभव होता, मात्र बसचे स्टेअरिंग हाती घेण्याची वेळ कधी आलीच नव्हती. मात्र कठीण प्रसंगात त्यांनी धाडस दाखवण्याचा निर्णय घेतला.

फिट आलेल्या चालकाला त्यांनी उपचारासाठी नेले आणि महिलांना वाहन चालवत इच्छित स्थळी पोहचवले. त्यांचा बस चालवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांच्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

बसच्या धडकेतून बचावला स्कूटरचालक! काळजाचा थरकाप उडवणारा हा Viral Video पाहा

ऑटोवाल्या भैयाचा हा देशी जुगाड पाहिला का? Viral Video पाहून यूझर्स म्हणतायत, वाह! क्या सीन है!

कुत्री आणि मांजरांचा हा Viral Video पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘ये लाजवाब है!’

Published On - 9:31 am, Fri, 14 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI