लग्न पंढरपुरात, गाव कुरवली, अंतर 90 किलोमीटर, मग नवरदेवानं मतदानासाठी केली अशी धडपड
साडेबारा वाजता अक्षता पडताच तो थेट वधूला घेऊन ९० किलोमीटर अंतर पार करत गावात पोहचला. मतदान केलं.

इंदापूर : ग्रामपंचायत निवडणुका हा लोकशाहीचा पाया समजला जातो. हा पाया मजबूत करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील कुरवली येथील एका युवकाने आदर्श घालून दिला. लग्नाच्या दिवशीच मतदान असल्याने अक्षदा पडतात थेट मतदान केंद्र गाठत मतदान केले. मतदानानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. विशेष बाब म्हणजे त्यांच्याबरोबर नववधू ही त्या ठिकाणी उपस्थित होती. त्यासाठी या युवकाला ९० किमी अंतर कापावे लागले. त्यासाठी स्वतःच्या लग्नानंतर त्यानं जेवणही केलं नाही. साडेबारा वाजता अक्षता पडताच तो थेट वधूला घेऊन ९० किलोमीटर अंतर पार करत गावात पोहचला. मतदान केलं. त्यानंतरच सुटकेचा निःश्वास सोडला.
इंदापूर तालुक्यातील कुरवली येथील अक्षय चांगदेव चव्हाण या युवकाचा विवाह सोहळा 18 डिसेंबर रविवार रोजी पंढरपूर या ठिकाणी होता. योगायोग असा की आजच त्याच्या इंदापूर तालुक्यातील कुरवली या गावात ग्रामपंचायतीचे मतदान देखील होते. विवाह सोहळा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात दुपारी साडेबारा वाजता होता.
इंदापूर तालुक्यातील कुरवली गावातून पंढरपूर हे गाव जवळपास 80 ते 90 किलोमीटर अंतरावरती. त्यामुळे दुपारी विवाह सोहळा झाल्यानंतर नवरदेवाने गावात मतदान करण्यासाठी विवाह सोहळा लवकरच आटपून तो कुरवली गावाकडे मार्गस्थ झाला.
विशेष बाब म्हणजे विवाह सोहळ्यात या नवरदेवाने जेवण सुद्धा केले नाही. जर जेवणाच्या पंक्तीत बसलो तर या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी उशीर होईल. गावाकडील मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्यामुळे या नवरदेवाने विवाहात जेवण न करता डायरेक्ट गावाकडची वाट धरली.
कुरवली या आपल्या गावाकडे येताचं त्याने सोबत नववधू घेऊन येत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सध्या या नवरदेवाची चर्चा इंदापूर तालुक्यासह पंचक्रोशीत होत आहे. या नवरदेवाचे कौतुकही ठिकठिकाणी होत आहे.
