वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांना झटका, पुण्यात 36 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील 36 हजार 139 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 89 कोटी 55 लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे (MSEB cut 36 thousand power supply in Pune).

वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांना झटका, पुण्यात 36 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित
वीज वाहिनी

पुणे : वारंवार आवाहन करूनही थकीत वीज बिलांचा भरणा होत नसल्याने आर्थिक ओढग्रस्त झालेल्या महावितरणकडून नाईलाजाने सलग 10 महिने एकही वीजबिल न भरलेल्या पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील 36 हजार 139 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 89 कोटी 55 लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे (MSEB cut 36 thousand power supply in Pune).

दरम्यान गेल्या एक फेब्रुवारीपासून पुणे परिमंडलात थकीत वीजबिलांचा भरणा वाढला असून 1 एप्रिल 2020 पासून एकही वीजबिल न भरलेल्या 97 हजार 413 ग्राहकांनी आतापर्यंत 145 कोटी 75 लाख रुपयांचा भरणा केला आहे. चालू आणि थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शुक्रवार (19 फेब्रुवारी) ते रविवारपर्यंत (21 फेब्रुवारीपर्यंत) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे.

केवळ वीजबिलांच्या वसुलीवर आर्थिक भिस्त असणाऱ्या महावितरणची स्थिती ही वीजखरेदी, दैनंदिन देखभाल आणि दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापनांचा खर्च भागविण्याइतपत सध्या राहिलेली नाही. त्यामुळे नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याचा कटू कारवाई सुरु करण्यात आली आहे. सध्या पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक 10 लाख 8 हजार 776 ग्राहकांकडे 819 कोटी 71 लाख रुपयांची थकबाकी आहे. यात घरगुती 8 लाख 49 हजार 990 ग्राहकांकडे 505 कोटी 23 लाख, वाणिज्यिक 1 लाख 38 हजार 648 ग्राहकांकडे 211 कोटी 70 लाख, औद्योगिक 20 हजार 138 ग्राहकांकडे 102 कोटी 77 लाख रुपयांची थकबाकी आहे.

पुणे परिमंडलामध्ये प्रामुख्याने गेल्या 1 एप्रिल 2020 पासून एकही वीजबिल न भरलेल्या घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांविरुद्ध वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. यात बुधवारपर्यंत पुणे शहरातील (कंसात थकबाकी) 19388 (42.17 कोटी), पिंपरी व चिंचवड शहर 9885 (24.90 कोटी) आणि हवेली ग्रामीण, मुळशी, वेल्हे, आंबेगाव, जुन्नर, मावळ आणि खेड तालुक्यातील 6866 (22.48 कोटी) थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे (MSEB cut 36 thousand power supply in Pune).

या कारवाईमध्ये घरगुती- 13650, वाणिज्यिक- 20233 तर औद्योगिक 2256 ग्राहकांचा समावेश आहे. यासोबतच थकीत वीजबिलांचा भरणा करण्यास देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 17 दिवसांमध्ये पुणे परिमंडलातील 97 हजार 413 ग्राहकांनी 145 कोटी 75 लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांचा भरणा केला आहे. यामध्ये घरगुती 66179 ग्राहकांनी 55 कोटी 59 लाख, वाणिज्यिक 28 हजार 5 ग्राहकांनी 63 कोटी 80 लाख आणि औद्योगिक 3229 ग्राहकांनी 26 कोटी 36 लाख रुपयांचा भरणा केला आहे.

आर्थिक संकटग्रस्त महावितरणला सहकार्य करून चालू आणि थकीत वीजबिलांचा भरणा करावा. नाईलाजाने सुरु केलेली वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. लघुदाब वीजग्राहकांना घरबसल्या चालू आणि थकीत वीजबिल ‘ऑनलाईन’ भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट आणि मोबाईल अॅपची सेवा उपलब्ध आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यातील सर्व सार्वजनिक सुटीच्या दिवशी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत.

हेही वाचा : 100 युनिट वीजबिल माफी देणार असं म्हटलंच नव्हतं : ऊर्जामंत्री नितीन राऊत

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI