VIDEO: शाळा सुरू ठेवाव्यात की ठेवू नये?, सुप्रिया सुळे यांनी सूचवला उपाय; राजेश टोपेंशीही चर्चा करणार

VIDEO: शाळा सुरू ठेवाव्यात की ठेवू नये?, सुप्रिया सुळे यांनी सूचवला उपाय; राजेश टोपेंशीही चर्चा करणार
सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोविड काळातही शाळा सुरू होत्या. त्या कशा सुरू होत्या? त्यासाठी काय खबरदारी घेण्यात आली?

योगेश बोरसे

| Edited By: भीमराव गवळी

Jan 17, 2022 | 12:00 PM

पुणे: राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोविड काळातही शाळा सुरू होत्या. त्या कशा सुरू होत्या? त्यासाठी काय खबरदारी घेण्यात आली? या सक्सेस स्टोरींचा राज्य सरकारने विचार करावा आणि शाळांबाबत निर्णय घेतला पाहिजे, असं मत व्यक्त करतानाच या संदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. मी अनेक शाळा सुरू असलेल्या पाहिल्या आहेत. हिवरे बाजारमध्ये शाळा सुरू होती. नाशिकच्या एका शाळेची माहिती आली आहे. कोविडच्या काळात शाळा सुरू आहेत. या निमित्ताने शाळा सुरू ठेवण्याचे काही मॉडेल्स समोर आले आहेत. कोविडच्या पहिल्या टप्प्यात आपण सर्वच पॅनिक होतो. त्यामुळे शाळा बंद करणं योग्य होतं. दुसऱ्या टप्प्यातही शाळा बंद ठेवल्या. तीही लाट वाईट होती. गेल्या दीड दोन वर्षात शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांच्या शाळेत अडचणी आल्या आहेत. एक फोन असेल तर घरात तीन तीन मुलं आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेताना अडचणी येत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारला विनंती राहील की, सर्वांनी एकत्र येऊन सक्सेस स्टोरीचा विचार करावा. शंभर टक्के शाळा सुरू होणार नाही हे मान्य आहे. पण 50 टक्के किंवा 25 टक्के वर्ग ब्रेक करावा, अल्टरनेट डेला शाळा सुरू करावी, असं काही तरी करून निर्णय घ्यावा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार द्या

तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना शाळांबाबतचे अधिकार द्यायला हवेत. ज्या शाळा सुरू आहेत. त्या मॉडेलचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा विचार करण्याबाबत तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे. त्यामुळे मुलांना आणि पालकांना आधार होईल. गावातील शाळांना पटांगण असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना आत बसवू नका. त्यांना बाहेर बसवा. पण काही तरी मार्ग काढला पाहिजे. टास्क फोर्सचं मार्गदर्शन घ्या. कोविडमध्ये शाळा चालवणाऱ्यांची माहिती घ्या, सक्सेस स्टोरीचा अभ्यास करून सुवर्णमध्य काढला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपेंशी याबाबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

फडणवीसांना टोला

यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला. शरद पवारांना त्यांच्याच केंद्र सरकारनेच पद्म पुरस्कार दिला होता हे फडणवीस पवारांवर टीका करताना विसरले, असा चिमटा त्यांनी काढला.

योगींची कामे थोडी, जाहिरात फार

उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि जयंत चौधरींकडे आम्ही अपेक्षेने पाहत आहोत. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारकडून अपेक्षित काम झालेले नाही. त्याची जाहिरात मात्र खूप झालीय, असा चिमटा त्यांनी काढला.

पवार-राजनाथ सिंह यांची बैठक होणार

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीला पलकमंत्री, पुण्यातील सर्व खासदार, आमदार आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत. यासाठी खासदार बापट आणि शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

मानेप्रकरणावर कोल्हे बोलतील

यावेळी त्यांनी अभिनेता किरण माने प्रकरणावर बोलणं टाळलं. किरण मानेंबद्दल मीडियातून मिक्स सिग्नल्स माहीती मिळतेय. खासदार अमोल कोल्हे याबाबत बोलतील, असं त्या म्हणाल्या.

संबंधित बातम्या:

N. D. Patil Medical Bulletin : ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांची प्रकृती गंभीर, कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार

शरद पवारांची मेट्रोतून सफर, पुणे मेट्रोच्या कामाचा घेतला आढावा

PHOTO: वाघिणीचा जेव्हा अंत होतो.. पेंच अभयारण्यातली 29 बछड्यांची आई दगावली, वन्यप्रेमी हळहळले!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें