अनेकांनी इतिहासाचे वास्तव चित्र मांडले आहे. आ. ह. साळुंखे यांच्यासारख्या व्यक्तींनी वास्तव इतिहास पुढे मांडला आहे. तो वास्तव इतिहास पुढे येईल, याची काळजी घेतली आहे. इतिहासातील सिलेक्टेड भाग घेऊन त्याच्यातून वेगळी भावना मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सगळ्या गोष्टीला यंत्रणा असण्यापेक्षा जागरूक नागरिक आणि लेखकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी गरज त्यांनी व्यक्त केली. तर सुदैवाने पुरंदर किल्ला लष्कराच्या ताब्यात आहे. माझ्याकडून राज्य सरकारला विनंती केली जाईल, की इतर किल्ल्याप्रमाणे पुरंदरकडे लक्ष द्यावे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्य घटनेमुळे भारत हा एक संघ आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, की भारताच्या आजूबाजूच्या देशांत घटना नसल्याने ते देश संकटात गेले. आम्ही राजकारणी लोक, मात्र आमच्यापेक्षा सामान्य माणूस शहाणा आहे. त्यामुळे तो योग्यवेळी सत्ता देतो आणि निर्णय चुकला तर सत्ता काढूनदेखील घेतो, असा टोला शरद पवार यांनी भाजपाला लगावला.
विमानतळ झालेच पाहिजे. परंतु प्रस्तावित जागेला विरोध होत आहे. एका जागेला केंद्र सरकारने प्रतिकुलता दाखवली आहे. त्यावर तोडगा काढला पाहिजे. पुरंदरला जर विमानतळ झाले तर सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्याला फायदा होईल, असे शरद पवार म्हणाले. यावेळी शरद पवार यांनी महागाई, भाजपा सरकार तसेच राज ठाकरे आणि त्यांना होणार अयोध्या दौऱ्याला विरोध आदी विषयांवर आपले मत मांडले.