त्या रात्री काय घडलं? पांढरी कार, नवरा आणि… दीप्ती चौधरीचे अखेरचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
काही दिवसांपूर्वी पुण्यातील दिप्ती चौधरी आत्महत्या प्रकरण चर्चेत होते. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून एका इंजिनिअर महिलेने आत्महत्या केली. ही संतापजनक घटना पुण्यातील उरुळी कांचन तालुक्यातील सोरतापवाडी येथे घडली. विवाहित महिलेचे नाव दिप्ती मगर-चौधरी असे आहे. मृत महिलेची सासू सरपंच असून सासरे शिक्षक असल्याची माहिती समोर आली होती. आता या घटनेचा एक सीसीटीव्ही समोर आला आहे.
दिप्ती चौधरी आत्महत्येच्या घटनेनंतरचे घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. दिप्ती चौधरीने आत्महत्या केल्यानंतर पती रोहन चौधरी यांनी तिला घराबाहेर आणले. त्यानंतर तातडीने त्यांनी तिला गाडीत ठेवले. घरातील इतर सदस्य देखील तेथे उभे असल्याचे दिसते. त्यानंतर दिप्तीने आत्महत्या केल्याचे समजताच तिचे सासू आणि सासरे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचार संपवून पळत घरी आहे.
रोहन चौधरी यांनी दिप्तीला गाडीत बसवले. त्यानंतर त्यांची आई गाडीत बसली. संपूर्ण कुटुंबीय पळत हॉस्पिटलमध्ये पोहोचले. पण डॉक्टरांनी दिप्तीला मृत घोषीत केले. सासरच्या जाचाला कंटाळून दीप्ती चौधरी यांनी आत्महत्या केली. दिप्तीच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चौधरी कुटुंबियांना ताब्यात घेतले आहे.
दीप्तीच्या आई हेमलता मगर (वय ५०) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यामध्ये-
दीप्तीचे लग्न रोहन कारभारी चौधरी यांच्याशी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी वृंदावन गार्डन, थेऊर येथे रितीरिवाजाप्रमाणे झाले. लग्नानंतर सुरुवातीचे एक महिना सर्व काही व्यवस्थित चालले. त्यानंतर २५ डिसेंबर २०१९ पासून तिच्या पती रोहनने तिच्या चरित्रावर संशय घेऊन तिचा छळ सुरू केला. पती, सासू-सासरे आणि दीर यांनी तिला सतत अपमानास्पद बोलणे केले, जसे की “तू देखणी नाहीस”, “तुला स्वयंपाक, कपडे धुणे, घर साफ ठेवणे येत नाही”, “शेतात काम करणाऱ्या बायका तरी चांगल्या आहेत” अशी विधाने करून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला.
पुढे त्यांनी तक्रारीमध्ये म्हटले की, पतीने हाताने मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी सुरू केली. सुरुवातीला दीप्तीने आईला काही सांगितले नाही, पण नंतर तिने आईला त्रासाबाबत सांगितले. काही काळानंतर दीप्तीला दिवस गेले आणि ४ मे २०२३ रोजी तिची डिलिव्हरी झाली. मुलगी झाल्याने सासरच्या लोकांनी नाराजी व्यक्त केली. नंतर दीप्तीने आईला फोन करून सांगितले की, त्यांचा एक्सपोर्ट व्यवसाय बंद झाला आहे. त्यामुळे पती रोहनने माहेरून १० लाख रुपये नवीन व्यवसायासाठी आणण्याची मागणी केली. हे पैसे दीप्तीच्या कुटुंबाने रोख स्वरूपात दिले. पुढे काही दिवस व्यवस्थित चालले, पण नंतर रोहनने पुन्हा तक्रार सुरू केली की, लग्नात तिच्या वडिलांनी हुंडा म्हणून चारचाकी गाडी दिली नाही. संसार सुखाचा व्हावा म्हणून दीप्तीच्या कुटुंबाने पुन्हा २५ लाख रुपये रोख स्वरूपात चारचाकी गाडी घेण्यासाठी दिले. 2025मध्ये पुन्हा दीप्तीला दिवस गेले होते. पहिली मुलगी असल्यामुळे तिच्या इच्छेविरुद्ध गर्भलिंग तपासणी केली. मुलगी असल्याचे कळतचा गर्भपात केला.
