पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये पवारांची फिल्डिंग; महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? सुप्रिया सुळेंचा एक फोन अन्…

Sharad Pawar-Ajit Pawar NCP: भाजपने पुण्यात राष्ट्रवादी सोबत जाण्यास नकार घंटा दिल्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये पवारांनी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीविरोधात भाजप असा सामना रंगणार आहे.

पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये पवारांची फिल्डिंग; महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? सुप्रिया सुळेंचा एक फोन अन्...
अजित पवार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस
Image Credit source: गुगल
| Updated on: Dec 16, 2025 | 9:37 AM

अजिंक्य धायगुडे/प्रतिनिधी: पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर हालचालींना वेग आला आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी मतविभाजनाचा फटका बसू नये यासाठी एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. यापूर्वी दादांच्या राष्ट्रवादीसोबत न जाण्याचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. पण आता राजकीय गणितं आणि समीकरणं बदलली आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड नंतर पुण्यातही (Pune, Pimpri Chinchwad Municipal Corporation Election)दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्यास आश्चर्य वाटायला नको.

दोन्ही राष्ट्रवादीची बैठक

पिंपरी चिंचवडमधील अजितदादांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे या दोघांची नुकतीच बैठक झाली. नाना काटे यांना सुप्रिया सुळे यांचा फोन आला होता. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. दादांना देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढाव्यात असं सांगणारं असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं होते असा दावा नाना काटे यांनी केला. त्यानुसार ही बैठक झाली.

कोणत्या चिन्हावर लढवणार निवडणूक?

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून इच्छुक असणारे अनेक जण उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेत आहेत. जर स्वतंत्र लढलो तर मतविभाजन होऊन भाजप आणि इतर पक्षांना फायदा होईल. त्यामुळे मत विभाजन टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे घड्याळावर की तुतारीवर लढायचं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दोन्ही बाजुचे नेते एकत्र येऊन त्याविषयीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

दोन्ही ठिकाणी भाजपविरोधात लढत

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास, भाजपविरोधात त्यांचा सामना होईल. मुंबईतही भाजप-शिवसेनेने अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतले नाही. त्यामुळे राज्यात मैत्रिपूर्ण लढत होतील. पण पुणेच्या बालेकिल्ल्यात भाजपविरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि सामना रंगेल. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग वाढले आहे. भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकाऱ्यांनी दादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. येत्या काही दिवसात दोन्ही बाजूने फाडाफोडीचे राजकारण दिसून येईल. यामध्ये नाराज नेत्यांना लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर पुण्याचा बालेकिल्ला हातचा जाऊ नये यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.