Biogas plant : परवडत नसल्यानं पुण्यातले बायोगॅस प्रकल्प बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय; कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया
ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया (Wet waste processing) करून त्यापासून बायोगॅस निर्मितीसाठी पुणे महानगरपालिकेने गेल्या दहा वर्षात जवळपास शंभर कोटी रुपये खर्च केले आहेत. शहराच्या विविध भागात हे बायोगॅस प्रकल्प उभारले आहेत.

पुणे : शहरातील अनेक बायोगॅस प्रकल्प बंद करण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या (Pune Municipal corporation) घनकचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे. बायोगॅस प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीचा तसेच प्रकल्पापर्यंत ओला कचरा वाहतुकीचा खर्च परवडत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासकीय मान्यतेनंतर बायोगॅस प्रकल्प (Biogas plant) बंद करण्यात येणार असून या निर्णयामुळे प्रकल्पांवर आत्तापर्यंत केलेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात जाणार असल्याचेदेखील दिसत आहे. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया (Wet waste processing) करून त्यापासून बायोगॅस निर्मितीसाठी पुणे महानगरपालिकेने गेल्या दहा वर्षात जवळपास शंभर कोटी रुपये खर्च केले आहेत. शहराच्या विविध भागात हे बायोगॅस प्रकल्प उभारले आहेत. त्यांची क्षमता पाच ते दहा टन एवढी आहे, अशी माहिती समोर आली आहे.
किती प्रकल्प बंद?
महापालिकेच्या वतीने पहिला प्रकल्प मॉडेल कॉलनी परिसरात सन 2008-09मध्ये उभारण्यात आला. यातील बहुतांश प्रकल्पांची कालमर्यादा संपुष्टात आली आहे. त्यानंतरही या प्रकल्पांसाठी देखभाल दुरुस्तीचा खर्च महापालिका करत होती. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र आता हा खर्च परवडत नसल्याने प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण सद्यस्थितीला शहरातील एकूण किती प्रकल्प बंद आहेत. या आकडेवारीत मात्र मोठी तफावत जाणवत आहे.
वैधता संपल्याचे कारण
महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन अधिकारी आशा राऊत यांनी मात्र यातील बऱ्याच प्रकल्पांची वैधता संपली असल्याने हे प्रकल्प बंद असल्याचे सांगितले आहे. सध्या 25 प्रकल्पांपैकी 20 प्रकल्प बंद करण्याच्या हालचारी सुरू झाल्या आहेत. ओला कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्याचे सध्याचे महापालिकेचे धोरण आहे. दरम्यान प्रभागातील कचरा प्रभागातच जिरवण्याचे आणि बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे पालिकेचे धोरण होते. त्यासाठी पाच ते दहा टन क्षमतेचे बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आले होते.
कसे काम करते बायोगॅस?
बायोगॅस प्लांट ही एक कृत्रिम प्रणाली आहे, जिथे तुम्ही कचऱ्याचे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम करून शाश्वत ऊर्जा आणि खतांमध्ये रूपांतरित करू शकता. बायोगॅस वनस्पती अॅनारोबिक पचनावर अवलंबून असतात, एक किण्वन प्रक्रिया ज्यामध्ये मिथेन वायू (बायोगॅस) तयार करण्यासाठी सूक्ष्मजीवांद्वारे कचरा पचवला जातो. कचऱ्याचे जैव खतामध्ये रूपांतर करून थेट शेतात विखुरले जाऊ शकते किंवा नैसर्गिक वायूसह बायोगॅसचा इंधन म्हणून वापर केला जाऊ शकतो.
