RSS Meeting : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कामकाज कसं सुरु आहे? पुण्यातील बैठक कशासाठी? पाहा काय म्हणाले मनमोहन वैद्य…
RSS Manmohan Vaidya on SP College Meeting : पुण्यातील एस. पी. महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक. RSS चं कामकाज अन् पुण्यातील बैठक; पाहा काय म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मनमोहन वैद्य...

पुणे | 16 सप्टेंबर 2023 : पुण्यातील एस. पी. महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक पार पडली. या बैठकीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसर कार्यवाहक मनमोहन वैद्य यांनी माहिती दिली. संघाच्या तीन दिवसीय समन्वय बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. संघ कार्यात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. समृद्ध भारतासाठी काय करायला हवं, याबाबत या बैठकीत चर्चा झाली. संघाच्या शाखा 2020 मध्ये 38 हजार होत्या. त्या वाढून 2023 मधे 42 हजार झाल्या आहेत. संघासोबत स्वतः ला जोडून घेण्यासाठी दरवर्षी एक ते सव्वा लाख विनंती आम्हाला येत आहेत. यामध्ये तरुणांचा सहभाग अधिक आहे. देशविरोधी शक्ती पराभूत होत आहेत, असं मनमोहन वैद्य म्हणालेत.
या बैठकीसाठी देशभरातून 36 संघटनांचे 267 प्रतिनिधी उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारणी समिती बैठकीचा आज समारोप झाला. देशभरात घडणाऱ्या सामाजिक, धार्मिक,आर्थिक घडामोडींसह इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. ‘स्वावलंबी भारत अभियान’चीही सुरुवात झाली आहे. या बैठकीनंतर संघाच्या वतीने या बैठकीची माहिती देण्यात आली. संघाचे सहसर कार्यवाहक मनमोहन वैद्य यांनी माध्यमांशी संवाद साधला.
एस. सी. एस. टी . समाजाला दुर्दैवाने दूर ठेवण्यात आलं. त्यांना संविधानाने दिलेलं आरक्षण मिळालं पाहिजे. मात्र इतर आरक्षणाबाबत चर्चा झाली नाही. राममंदिराचं काम पूर्ण होत आलेय. जानेवारीत मकर संक्रांतीच्या आसपास राममंदिरात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होईल. सनातन धर्माला जे लोक नष्ट करण्याची भाषा करतायत त्यांना सनातन या शब्दाचा अर्थ माहित आहे का? भारताची ओळख ही अनादी काळापासून अध्यात्मिक आहे. जे सनातन धर्माला विरोध करतायत त्यांना सनातन धर्म म्हणजे काय म्हणायचंय हे विचारायला हवं, असंही मनमोहन वैद्य म्हणालेत.
तामिळनाडूत द्रविड कळगमच्या एका कार्यकर्त्याने संघ शाखेला भेट दिली आणि मिठाई वाटली. पेरियार यांना जी समानता आणता आली नाही. ती संघाने आणली असं तो म्हणाल भारताला भारत म्हटलं पहिजे. दुसऱ्या कुठल्या देशाला दोन नावं नाहीत. 2014 नंतर भारत आपल्या सांस्कृतिक ओळखीसह उभा राहतोय. राजकीय दिशा योग्य आहे. इंग्लंडमधून प्रकाशित होणाऱ्या द संडे गार्डियनने 2014 ला संपादकीयकात म्हटलं की खऱ्या अर्थाने भारताची ब्रिटिश ओळख संपली आहे, असंही मनमोहन वैद्य यांनी सांगितलं.
मणिपूरची स्थिती चिंताजनक आहे पण तिथले निर्णय सरकारने घेणं अपेक्षित आहे. तिथल्या कार्यकर्त्यांकडून माहिती मिळत आहे. दोन्ही गटांसाठी मदत सुरू आहे, असं मनमोहन वैद्य म्हणालेत.
