कोचिंग क्लास, रक्तबंबाळ विद्यार्थी अन् मित्र… अल्पवयीन मुलांमधील गँगवॉरमुळे पुणे हादरले
पुण्याच्या राजगुरुनगर येथील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा भयानक गँगवॉर घडला. क्लासमध्येच एका अल्पवयीन मुलावर त्याच्या क्लासमेटने चाकूने वार केले, ज्यात मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनामंध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता पुण्यात अल्पवयीन मुलांमध्ये झालेल्या भयानक गँगवॉर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याजवळील राजगुरुनगरमधील एका खासगी क्लासमध्ये विद्यार्थ्याचा चाकूने वार करुन खून केल्याची घटना समोर आली आहे. इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षक शिकवत असतानाच बेंचवर बसलेल्या एका विद्यार्थ्यावर त्याच्याच क्लासमधील विद्यार्थी मित्राने हल्ला केला. ज्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच खासगी कोचिंग क्लासमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडलं?
राजगुरुनगर येथील संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये दुपारच्या सुमारास ही भयानक घटना घडली. या क्लासमध्ये इयत्ता दहावीचा क्लास सुरू असताना एका अल्पवयीन विद्यार्थ्याने अचानक आपल्या क्लासमेटवर चाकूने हल्ला केला. यावेळी आरोपी विद्यार्थ्याने मृत विद्यार्थ्याच्या गळ्यावर आणि पोटात चाकूने अनेक वार केले. रक्तबंबाळ झालेल्या विद्यार्थ्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हल्ला करणारा विद्यार्थी या घटनेनंतर दुचाकीवरून तात्काळ फरार झाला.
पोलीस काय म्हणाले?
या घटनेची माहिती मिळताच राजगुरुनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी भेट दिली आणि तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाजगी कोचिंग क्लासमध्ये ही घटना घडली आहे. आरोपी आणि मृत यांच्यात जुना वाद होता का, या दिशेने आम्ही तपास करत आहोत. अजून तपास करणे गरजेचे आहे.”
सध्या पोलिसांनी शाळा सुटल्यानंतरही परिसरात पेट्रोलिंग सुरू केले आहे. आरोपी आणि मृत विद्यार्थी दोघेही अल्पवयीन आहेत. या हल्ल्यामागचे नेमके कारण काय होते, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या भयानक घटनेमुळे राजगुरुनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून खासगी कोचिंग क्लासच्या व्यवस्थापनावर आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पालकांमध्ये भीतीचे वातावरण
दरम्यान या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक पालकांनी शाळा सुटायच्या वेळी शाळेबाहेर मोठी गर्दी करत पाल्यांना स्वतः घरी घेऊन जात आहेत. या गंभीर प्रकारामुळे शैक्षणिक संस्थांतील सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा व क्लासमध्ये कडक नियम लागू करण्याची आणि पोलिसांकडून त्वरित कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. तसेच, शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांमध्ये वारंवार होणाऱ्या हाणामारीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
