कर्नाटक करू शकतं, तुम्ही का नाही? रोहित पवार यांचा राज्य सरकारला सवाल
रोहित पवारांनी महाराष्ट्र सरकारच्या दुष्काळ घोषणेतील विलंबावर तीव्र टीका केली. कर्नाटकने त्वरित दुष्काळ जाहीर करून केंद्राकडे मदत मागितली असताना, महाराष्ट्र सरकार 5 ऑक्टोबरची वाट का पाहत आहे, असा सवाल त्यांनी केला. VEDAS आकडेवारीनुसार गंभीर स्थिती असूनही, मुख्यमंत्री शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत, पवारांनी सरकारला शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळल्यास माफ केले जाणार नाही असा इशारा दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑक्टोबरपासून पंचनामे करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज्य सरकारच्या या घोषणेवर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. कर्नाटकाने दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच मदतीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलाही आहे. जर कर्नाटक सरकार दुष्काळ जाहीर करून मदतीसाठी केंद्राकडे मागणी करू शकतो तर महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही? असा सवाल शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत राज्य सरकारने निर्माण केलेल्या भ्रमावर जोरदार टीका केली आहे.
रोहित पवार यांनी ट्विटमध्ये कर्नाटकातील दुष्काळावर सविस्तर माहिती दिली आहे. शेजारच्या कर्नाटक सरकारने 28 ऑगस्ट रोजी 101 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला, तर कालदेखील नव्याने 23 तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे घोषित करून केंद्राकडे एनडीआरएफच्या मदतीसाठी प्रस्तावदेखील पाठवलाय. दुष्काळाची भीषण परिस्थिती बघता महाराष्ट्रात कर्नाटकपेक्षा वेगळी परिस्थिती नाही, खरीप हंगाम पूर्णतः वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झालाय, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
शेजारच्या कर्नाटक सरकारने २८ ऑगस्ट रोजी १०१ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला, तर कालदेखील नव्याने २३ तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे घोषित करून केंद्राकडे NDRFच्या मदतीसाठी प्रस्तावदेखील पाठवलाय. दुष्काळाची भीषण परिस्थिती बघता महाराष्ट्रात कर्नाटकपेक्षा वेगळी परिस्थिती नाही, खरीप… pic.twitter.com/VceoO11ZKf
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 19, 2026
वाट का पाहत आहेत?
केंद्र सरकारच्या VEDAS उपग्रहाच्या आकडेवारीनुसार, सद्यस्थितीला महाराष्ट्रातील 203 तालुक्यांमध्ये Rainfall Deviation दिसून येते, 140 तालुक्यांमध्ये Rainfall Deviation आणि 4 आठवड्यांचा पावसाचा खंड, तर तब्बल 280 तालुक्यांमध्ये Rainfall Deviation आणि 3 आठवड्यांचा पावसाचा खंड हे दुष्काळाचे ट्रिगर लागू पडतात. अशा परिस्थितीत तत्काळ दुष्काळ घोषित करणं गरजेचं असताना मुख्यमंत्री 5 ऑक्टोबरपूर्वी पंचनामे केल्यास NDRFची मदत मिळणार नसल्याचे भ्रम पसरवत आहेत. वास्तविक, दुष्काळ घोषित करण्याचा आणि 5 ऑक्टोबरचा काडीमात्र संबंध नाही. कर्नाटक सरकार दुष्काळ घोषित करून केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवू शकत असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 5 ऑक्टोबरची वाट का पाहत आहेत?, असा सवाल पवार यांनी केला आहे.
तर तुम्हाला माफ करणार नाही
प्रत्येक बाबतीत अटीशर्ती टाकण्यात देवेंद्र फडणवीसांचा हात कुणीच धरू शकत नाही, त्यामुळे परतीच्या पावसात थोडाफार पाऊस पडल्यास बऱ्याच भागात दुष्काळ घोषित करण्याची गरज पडणार नाही. सरकारचा पैसा वाचेल, हा जर मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या ‘मित्रा’च्या टीमचा कयास असेल तर तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा करत आहात, असा त्याचा स्पष्ट अर्थ होईल आणि याबाबत आज कमालीचा अडचणीत असलेला बळीराजा तुम्हाला कदापि माफ करणार नाही, हे विसरू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
