पुणे : स्वातंत्र्य काळापासून सामाजिक बदलासाठी काम करणाऱ्या राष्ट्र सेवा दलाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप झालेत. लोक भारतीचे आमदार आणि सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त कपिल पाटील आणि राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्यावर नियमांना केराची टोपली दाखवत मर्जीतील लोकांना संघटनेवर लादल्याचा आरोप झाला आहे. विशेष म्हणजे हे आरोप करणाऱ्यांमध्ये राष्ट्र सेवा दलाच्या माजी अध्यक्षांसह अनेक विद्यमान पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. कपिल पाटील यांनी आपले राजकीय हेतू पूर्ण करण्यासाठी गणेश देवींमार्फत बेकायदेशीरपणे राष्ट्र सेवा दल संघटनेवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा गंभीर आरोप सेवा दलाचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रकाश कांबळे यांनी केलाय. तसेच या कृतीचा निषेध करण्यासाठी या पदाधिकाऱ्यांनी आज (9 ऑगस्ट) क्रांती दिनी पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांना मिळालेले पुरस्कार परत केले.