सरकारला सदबुद्धी देवो… शरद पवारांचा शनिवारी मोर्चा; दुष्काळ दौऱ्यापूर्वीच सरकारला घेरणार
महाराष्ट्रात भीषण दुष्काळाने शेतकरी संकटात आहेत, सरकारने अद्याप मदत जाहीर केली नाही. या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांनी २६ सप्टेंबर रोजी पंढरपूरमध्ये "दुष्काळ आक्रोश मोर्चा" आयोजित केला आहे. शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत मिळावी, या मागणीसाठी ते सरकारला घेरणार आहेत.

राज्यात अत्यंत भीषण दुष्काळ पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान तर झालंच पण येणाऱ्या काळात जनावरांच्या चारा आणि पाण्याची चिंताही शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. तसेच मुली लग्नाला आल्याने त्यांचं लग्न कसं करायचं? याची चिंताही शेतकऱ्यांना भेडसावत आहे. सरकारने अजून शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली नाही. तसेच राज्यात दुष्काळही जाहीर केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी शनिवारी मोर्चाचं आयोजन केलं आहे. दुष्काळी दौऱ्यापूर्वीच सरकारला घेरण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. सरकारला सदबुद्धी देवो… असे विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी आमचे आमदार आणि खासदार शेतकरी मोर्चापूर्वी विठ्ठल मंदिरात जाणार आहेत. येत्या 26 सप्टेंबर रोजी पंढरपुरात आम्ही मोर्चाचं आयोजन केलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. दुष्काळासाठी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली.
दोन आमदारांची दांडी
दुष्काळ आक्रोश मोर्चाचं नियोजन करण्यासाठी पंढरपुरात बैठक झाली. या बैठकीत पवारांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीला आमदार उत्तम जानकर आणि आमदार नारायण पाटील यांनी मात्र दांडी मारली होती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुख्यमंत्र्यांचा दौरा
दरम्यान, कालपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी भागाची पाहणी सुरू केली आहे. काल धाराशिव आणि लातूरमध्ये फडणवीसांनी दुष्काळी भागाची पाहणी केली. आज वाशिममध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी भागाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समजून घेतले. तसेच सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे. तुम्हाला सर्व मदत केली जाईल, असं आश्वासन फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलं.
जीआर काढणार
दरम्यान, दुष्काळाचा जीआर शनिवारपर्यंत काढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे दोन दिवसात जीआर निघणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
