पुणे : संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर आरोप असणाऱ्या तरुणीचा मृत्यू हा अपघात किंवा आत्महत्या असल्याचा अहवाल पुणे पोलिसांनी दिला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर टीकेची झोड उठली. या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांच्याशी संबंधित वादग्रस्त प्रकरणावर पोलिसांनी (Pune Police) माहिती दिली आहे. यासंबंधीचा अहवाल पोलिसांनी सादर केला आहे. दरम्यान, टीव्ही 9 मराठीने 11 जून 2022लाच हा अहवाल दाखवला होता. पुणे पोलिसांनी 8 जूनला संबंधित तरुणींच्या मृत्यूच्या कारणाचा अहवाल दिला होता. या प्रकरणी राठोड यांच्यांवर कोणताही गुन्हा दाखल नाही. तर दुसरीकडे संबंधित तरुणीच्या मृत्यूची वानवडी (Wanawadi) पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद आहे, हेदेखील पोलिसांनी सांगितले आहे.
पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात तरुणीचा मृत्यू हा अपघात किंवा आत्महत्या असल्याचे समोर आले असून पोलिसांनी आपल्या अहवालात तसे नमूद केले आहे. दरम्यान, संबंधित तरुणीच्या नातेवाईकांनी मात्र यावर संताप व्यक्त केला आहे. पोलीस तुमचेच आहेत. त्यामुळे क्लीनचिट देणारच, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
संजय राठोडप्रकरणी पुणे पोलिसांचा अहवाल
संबंधित तरुणी पूजा चव्हाण हिची आजी शांताबाई राठोड यांनी कालच याविषयी संताप व्यक्त केला होता. शिंदे सरकारकडून पूजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे काहीही झाले नाही. पोलिसांनी क्लीनचिट दिली. हे क्लीनचिट देणारे पोलीस तुमचेच आहेत. त्यामुळे वेगळे काही घडण्याची अपेक्षा नाहीच, असे त्या म्हणाल्या होत्या.
संजय राठोडप्रकरणी पुणे पोलिसांचा अहवाल
एक खुनी माणूस या सरकारमध्ये नेतृत्व करत आहे. आम्हाला शरम वाटते, मात्र तुम्हाला का नाही वाटत, असा सवालही त्यांनी केला आहे. एक पूजा नाही तर अशा लाखो पूजा चव्हाणचा बळी घेतले जात आहेत. तो मंत्री असो की संत्री… पूजाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत. शेवटच्या क्षणापर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे. जिथे न्याय मागायला गेलो, तोच गळा दाबायला निघाला आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांनीही संजय राठोड यांची पाठराखण करत आधीच्या सरकारवर टीका केली आहे.