पुणे : मुळशी धरणाची (Mulshi dam) जलाशय पातळी 605.70 मिटरवर पोहोचली आहे. तर संबंधित जलाशय साठा 506.52 द.ल.घ.मी. आहे. आज सकाळी सात वाजताची ही पातळी असल्याचे टाटा पॉवरकडून (Tata Power) सांगण्यात आले आहे. धरण जलाशय 88.74 टक्के क्षमतेने भरले आहे. धरण पाणलोट परिसरात मोठ्या प्रमाणात पर्ज्यन्यवृष्टी होत असून गेल्या 24 तासांत दावडी पर्ज्यन्यमापक केंद्रात 304 मीमी पावसाची नोंद झालेली आहे तसेच गेल्या 24 तासांत एकूण 49.49 द.ल.घ.मी आवकाची नोंद झालेली आहे. येत्या काही दिवसांचा भारतीय हवामान खात्याचा (IMD) अंदाज, सद्यस्थितीतील पर्ज्यन्याचा कल पाहता पुढील काही काळात आवश्यकतेनुसार धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा नियंत्रित विसर्ग करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावीत, असे टाटा पॉवरचे प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी सांगितले आहे.