राज्यात पावसाचा जोर वाढणार, कोकण आणि मध्य महाराष्ट्राबाबत आयएमडीकडून महत्वाची माहिती
कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात २५ जूनपर्यंत पावसाचा जोर कायम असणार आहे. राज्यातील प्रकल्पांमधील जलसाठाही वाढला आहे.

महाराष्ट्रात यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला. परंतु जूनच्या सुरुवातीला पावसाने ब्रेक घेतला. त्यानंतर राज्यात पाऊस सक्रीय झाला. पुढील तीन ते चार दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात २५ जूनपर्यंत पावसाचा जोर कायम असणार आहे.
मुंबईत पावसाची शक्यता
राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. पुण्यासह परिसरात रविवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. रविवारी मुंबईतील आकाशात काळे ढग दाटून आलेत. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान विभाग आणि महासागर माहिती सेवा केंद्राने लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पूरपरिस्थितीमुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Heavy rainfall very likely to occur at isolated places in the districts of Konkan -Goa and at Ghat areas of Madhya Maharashtra.तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/uSAE3h4vf3
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 21, 2025
कोकणात मुसळधार पाऊस पडणार
कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आँरेज अलर्ट दिला आहे. जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री आणि काजळी नदी सध्या दुथडी भरून वाहत आहेत. रविवारी रत्नागिरीमध्ये दिवसभर पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ५६२ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भात दमदार पावसाची प्रतिक्षा
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत अजून चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरी समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे ८० टक्के पेरण्या रखडल्या आहेत. ज्यांनी पावसाच्या आशेने पेरण्या सुरू केल्या त्यांना बियाण्याच्या नुकसानापोटी आर्थिक फटका बसण्याची चिंता आहे. शनिवारी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, जिल्ह्यांच्या तापमानात वाढ झालेली दिसून आली. नागपूरमध्ये कमाल तापमान ३७.८ अंश होते. आता २४ जूनपासून जोरदार पावसाचा अंदाज आहे.
पिंपळगाव खांड धरण भरले
अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यात मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील पिंपळगाव खांड धरण पूर्ण क्षमतेने भरले. धरण ओव्हरफ्लो झाल्याने पाणी सोडले जात आहे. मुळा नदीपात्रातून २१ हजार क्यूसेस वेगाने पाणी मुळा धरणाकडे जात आहे. यामुळे राहुरी तालुक्यातील मुळा धरणातही लवकरच पाण्याची आवक वाढणार आहे. आंबीत पाठोपाठ पिंपळगाव खांड धरणही भरल्याने शेतकरी समाधानी आहे.