काही मराठी माणसे यांच्यासाठी दलाल म्हणून काम करतात, राज ठाकरेंचा तो गंभीर आरोप…
राज ठाकरे यांनी नुकताच सत्ताधाऱ्यांसोबतच निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. यासोबतच त्यांच्या निशाण्यावर अदानी आणि अंबानी असल्याचेही बघायला मिळाले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाबद्दलही त्यांनी मोठा दावा केला.

मनसेच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. दिसेल ते त्यांना पाहिजे आहे. प्रत्येक काम अदानीला दिले जातंय. हे जमिनी खरेदी करत आहेत. आमची काही मराठी माणसे यांच्यासाठी दलाल म्हणून काम करत आहेत, त्यांना मदत करत आहेत. खोटी नावे भरून हे निवडणुकांना सामोरे जायचे म्हणत आहेत. देशात सत्ता त्यांची, राज्यात सत्ता त्यांची. आता त्यांना महापालिका पाहिजे. जोपर्यंत सर्व राजकिय पक्षांचे समाधान होत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणूका घेऊनच दाखवा, असा थेट मोठा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय. सर्वात अगोदर मतदान यादी स्वच्छ करा, त्यानंतर निवडणूका घ्या असे त्यांनी म्हटले.
राज ठाकरे यांनी त्यांच्या यादी प्रमुखांना काही आदेश दिले असून सर्व याद्या पाहा, कुठे कुठे या लोकांनी शेण खाल्ले हे पाहा म्हटले. फक्त आपणच नाही तर सर्वपक्षांनी हे करावे, जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, असे आमचे निवडणूक आयोगाला स्पष्ट म्हणणे आहे. यांची जी घाई सुरू आहे, ती याकरिताच आहे. त्यांनी सर्व अगोदरच जमवले आहे. राज ठाकरेंनी थेट निवडणूक आयोगालाच मोठा इशारा दिला आहे.
पुढे काय होणार हे तुम्हाला दुपारी 3 वाजता कळेल, सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद होणार असल्याचे त्यांनी म्हटले. जोपर्यंत याद्यांमधील घोळ स्पष्ट होत नाहीत, तोपर्यंत राज्यात निवडणुका नाहीच, अशी थेट भूमिका त्यांनी घेतली आहे. कुंपनच शेत खात असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले. अदानींना काही मराठी दलाल मदत करत असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले. राज ठाकरे यांनी पुढे गंभीर आरोप करत म्हटले की, शहरं अदानी, अंबानींला आंदण म्हणून द्यायचं म्हणून हे सर्व सुरू आहे.
छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून आता ते सर्व ऑपरेशन कमी करणार आहेत आणि हळूहळू आता सगळी तिकडे नेणार आहेत, नवी मुंबईला. जेवढे जेवढे तुमचे आस्तित्व आहे तेवढे हे मिटवण्यासाठी निघाले आहेत. भारतीय जनता पक्षाला जे मराठी मतदार मतदान करतात त्यांना मला सांगाचंय की, ज्यावेळी गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल ना तेव्हा ते तुम्हाला बघणार नाहीत. तुम्हालाही त्या वरंवट्यासाठी मराठी म्हणूनच घेणार.
