राज ठाकरेंनी भरसभेत टीव्ही 9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट दाखवला

राज ठाकरेंनी भरसभेत टीव्ही 9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट दाखवला

सोलापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांचा झंझावात सुरु आहे. नांदेडनंतर त्यांनी सोलापूरमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी सरकारच्या डिजीटल इंडिया योजनेचा कसा बोजवारा उडालाय, याबाबतचंही चित्र दाखवलं. अमरावती जिल्ह्यातील हरिसाल हे देशातलं पहिलं डिजीटल गाव म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. पण या गावात सध्या काय परिस्थिती आहे हा ग्राऊंड रिपोर्ट टीव्ही 9 मराठीने केला होता. या रिपोर्ट राज ठाकरेंनी भरसभेत दाखवून सरकारच्या दाव्यांची पोलखोल केली.

राज ठाकरेंनी त्यांच्या अगोदरच्या सभेत हरिसाल गावात काय परिस्थिती आहे, डिजीटल गावात इंटरनेटही नाही याबाबतचं वास्तव दाखवलं होतं. मनसे नेते संदीप देशपांडे आणि त्यांच्या टीमने गावाला भेट दिली होती. यानंतर टीव्ही 9 मराठीने या गावाचा आढावा घेतला आणि त्यानंतर एनकाऊंटर या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्नही विचारला होता. पण राज ठाकरेंनी दाखवलेली परिस्थिती जुनी आहे, आजचं चित्र तुम्ही जाऊन पाहा, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. आम्ही हे चित्र जाऊन पाहिल्यानंतर वास्तव समोर आलं.

लाभार्थी म्हणून ज्या जाहिरातीसाठी ज्या तरुणाची निवड केली होती, तो तरुणच आज मुंबई आणि पुण्यात रोजगार शोधतोय, तर गावात वायफायही नाही. ही सर्व परिस्थिती टीव्ही 9 मराठीने दाखवली. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या उत्तरासह टीव्ही 9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट दाखवला. विशेष म्हणजे जो लाभार्थी तरुण होता, त्यालाही राज ठाकरेंनी स्टेजवर बोलावलं. या तरुणाला आता आम्ही तुला सगळं देऊ असं म्हणून भाजपचे फोन येत असल्याचंही ते म्हणाले.

रोजगारावरुन पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

पंतप्रधान मोदींनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण त्यांच्या नोटाबंदीमुळे साडे चार ते पाच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, असा दावा राज ठाकरेंनी केला. महाराष्ट्रातल्या नोकऱ्यांमध्ये जर स्थानिक लोकांनाच फक्त प्राधान्य दिलं तर आरक्षणाची गरजच नाही. आज ग्रामीण महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार बसला आहे. आणि आपण सगळे जातीच्या चर्चांमध्ये अडकलोय. मुळात सरकारी नोकऱ्या राहिल्यात किती? जातीवरून मतं मिळवण्यासाठी आरक्षणाची आमिषं दाखवत आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.

“आमच्या सभांचा खर्च नाही, तुम्ही किती खोटं बोललात ते मोजा”

राज ठाकरे ज्या मतदारसंघात सभा घेतील त्या मतदारसंघातील उमेदवारावर राज ठाकरेंच्या सभेचा खर्च टाकावा, अशी मागणी भाजपचे नेते आणि मंत्री विनोद तावडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यावरुनही राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. आमच्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा तुम्ही किती खोटं बोललात याचा हिशोब आधी करा, असा टोला त्यांनी लगावला. शिवाय मोदींनी निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासनं दिली होती. त्यावर विश्वास ठेवून लोकांनी भरघोस मतदान केलं, पण तुम्ही खोटं बोललात, अशी टीका त्यांनी केली.

VIDEO : राज ठाकरेंचं सोलापूरमधील संपूर्ण भाषण

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *