5 जुलैचा मेळावा… कदम यांचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा, राज ठाकरेंना काय दिला सल्ला?
पाच जुलै रोजी विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे, मात्र त्यापूर्वीच रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज्यात हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापल्यानंतर अखेर सरकारने त्रिभाषा सुत्राबाबत काढलेले दोन्ही अध्यादेश मागे घेतले आहेत. हिंदी भाषेच्या मुद्द्यावर येत्या 5 जुलै रोजी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात येणार होतं. मात्र अध्यादेश मागे घेतल्यानंतर आता 5 जुलै रोजी विजयी मेळावा काढण्यात येणार आहे. या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दोघेही ठाकरे बंधू सहभागी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले कदम?
हिंदी सक्तीच्या विरोधात विजयी जल्लोष कसला साजरा करताय? असा सवाल करतानाच हिंदी सक्ती उद्धव ठाकरे यांनी केली असा घणाघात कदम यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, जेव्हा मुंबईतील सोसायट्यांमध्ये मराठी माणसांना मांस खाण्यास मनाई केली जाते तेव्हा तुम्ही कुठे गेले होते? मुंबई महापालिकेत 25 वर्ष यांची सत्ता होती, काय केलं मराठी माणसांसाठी? मराठी माणूस हा गिरगाव दादर येथून अंबरनाथ आणि कल्याणला गेला. मराठी माणूस आता मुंबईमध्ये फक्त 17 टक्के उरला आहे, असं कदम यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे हा आतल्या गाठीचा माणूस दाखवायचा चेहरा वेगळा आहे, राज साहेबांना विनंती आहे, जरा समजून जपून पुढचा विचार करा, ते काँग्रेससोबत गेले. उद्धव ठाकरे फक्त तुम्हाला वापरून घेतील. उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे होऊ शकले नाहीत, मग ते तुमचे कसे होणार? मुंबई महापालिकेची निवडणूक झाली की ते पुन्हा काँग्रेसकडे जाणार. मनोहर जोशी यांना लाखो लोकांसमोर मंचावरून खाली पाठवले. रावतेंना काहीच दिलं नाही. शिवसेना संपवण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरे कोणाच भाऊ होऊ शकत नाही, असा हल्लाबोल यावेळी कदम यांनी केला आहे. कदम यांच्या या टीकेनंतर आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
