गोरेगावातील मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या कामास प्रारंभ, सात वर्षात प्रकल्प पूर्ण होणार
या योजनेंतर्गत मोतीलाल नगर हे ‘१५ मिनिट्स सिटी’ म्हणून विकसित करण्यात येणार आहे. यात निवासी इमारतींसोबतच उद्याने, मोकळ्या जागा आणि नागरिकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर १, २ आणि ३ च्या पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रारंभिक कामास गेल्या दोन आठवड्यांपासून सुरुवात झाली आहे. गोरेगावातील मोक्याच्या ठिकाणी १४३ एकरांवर पसरलेला हा प्रकल्प मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा पुनर्विकास प्रकल्प आहे. या पुनर्विकास योजनेनुसार, वसाहतीतील मोकळ्या जागांवर आधी बांधकाम केले जाणार आहे.
बांधकामातील पहिला टप्पा म्हणजे मोतीलाल नगरमध्ये मृदा परीक्षणास मोतीलाल नगरमध्ये प्रारंभ केला असल्याचे म्हाडामधील अधिकाऱ्याने सांगितले. प्रकल्पाच्या बांधकाम आराखड्याबद्दल विचारले असता महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात, म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ संजीव जैस्वाल यांनी हे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती दिली. आराखडा सादर होऊन, म्हाडाने मंजूर केल्यानंतर प्रकल्पाचे तपशील रहिवाशांपुढे मांडले जातील, असेही संजीव जैस्वाल यावेळी सांगितले.
‘विशेष प्रकल्प’ दर्जा मिळाला
१९६० च्या दशकात विस्थापित प्रकल्पग्रस्तांना घरे देण्यासाठी बांधण्यात आलेल्या मोतीलाल नगर या वसाहतीकडे अनेक वर्षे दुर्लक्ष झाल्याने आणि बेसुमार अनधिकृत बांधकामांमुळे वसाहतीची अवस्था गंभीर झाली असून मुलभूत सोयीसुविधांचाही बोजवारा उडाला आहे. २०१३ साली मोतीलाल नगरच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने प्रयत्न सुरु केले आणि यावर्षी सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन आवश्यक त्या कायदेशीर मान्यतादेखील मिळाल्या आहेत. राज्य सरकारनेही या पुनर्विकास प्रकल्पाला ‘विशेष प्रकल्प’ दर्जा दिला आहे.
सर्वाधिक क्षेत्रफळाचे घर मिळणार
म्हाडाच्या या नव्या योजनेनुसार रहिवाशांना १६०० चौ. फुट बांधकाम क्षेत्राची घरे देण्यात येणार असून ९८७ चौ. फुट बांधकाम क्षेत्राचे व्यावसायिक गाळे देण्यात येणार आहे. या वसाहतीत ३३४० निवासी घरे असून ३२८ व्यावसायिक गाळे आहेत. “मुंबईत ‘सी&डीए’ तत्वावर राबवल्या जात असलेल्या प्रकल्पांपैकी मोतीलाल नगरमध्ये आजवरचे सर्वाधिक क्षेत्रफळाचे घर देण्यात आले आहे. मोतीलाल नगर वसाहतीतील विद्यमान घरांच्या क्षेत्रफळापेक्षा हे कित्येक पटींनी मोठे घर असणार आहे.” असे शिल्प असोसिएट्स या आघाडीच्या स्थापत्य संस्थेचे सीईओ आणि म्हाडाचे अनेक प्रकल्पांचे व्यवस्थापन सल्लागार निखील दीक्षित यांनी सांगितले.
प्रकल्प सात वर्षांत पूर्ण होणार
यावर्षी, दि. ११ मार्च रोजी अदाणी प्रॉपर्टीजने म्हाडाच्या निविदेमध्ये मध्ये रू. ३६,००० कोटींची सर्वोच्च बोली लावत या प्रकल्पात बाजी मारली. त्यानंतर जुलैमध्ये म्हाडा आणि अदाणी रिअॅल्टी यांदरम्यान करार झाला आणि अदाणी रिअॅल्टी यांची बांधकाम आणि विकास संस्था अर्थात, सी&डीए म्हणून नेमणूक झाली. मोतीलाल नगरचा पुनर्विकास सुमारे ५.८ लाख चौ. मी. क्षेत्रात होणार आहे तसेच यातून गृहनिर्माण संस्थेला एकूण ३.८३ लाख चौ.मी.क्षेत्रफळाचे बांधकाम क्षेत्र मिळणार आहे. हा पुनर्विकास प्रकल्प सात वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
