कुठे नणंद-भावजय, तर कुठे सासरा-सून यांच्यात लोकसभेची लढत, महाराष्ट्रात नातं-गोत्यांसह रंजक समीकरणं
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटलांचं एक उत्तर चर्चेत आलंय. धाराशीवमधून त्या उमेदवार आहेत. भाजप सोडून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर झाली. आता यापुढे राष्ट्रवादीचं वर्चस्व कसं वाढवणार? या प्रश्नावर अर्चना पाटलांनी काय म्हटलं? आणि त्यावर काय स्पष्टीकरण दिलं यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

भाजपात असलेल्या आमदार राणाजगतित सिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश देवून उमेदवारी दिली गेलीय. त्यामुळे जिल्ह्यात तुम्ही आता राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढवणार का? या प्रश्नावर अर्चना पाटलांच्या उत्तरानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. धाराशीव लोकसभेत 2019 ला शिवसेनेचे ओमराजे निंबाळकरांविरुद्ध तेव्हा राष्ट्रवादीत असलेल्या राणा जगजितसिंहांमध्ये लढत झाली होती. निंबाळकरांचा १ लाख २७ हजारांनी विजय झाला. तर राणा जगजितसिंह पराभूत झाले होते. यंदा धाराशीवमध्ये निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. तर निंबाळकरांविरोधात भाजपात असलेल्या राणा जगजितसिंहांच्या पत्नी अर्चना पाटलांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी घेतलीय.
धाराशीव लोकसभेत 3 जिल्ह्यातल्या विधानसभांचा समावेश आहे. धाराशीव जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, धाराशीव आणि परांडा या 4 विधानसभा, लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचा मतदारसंघ अशा 6 विधानसभा धाराशीव लोकसभेत येतात. यापैकी परांडा आणि उमरग्यात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. तुळजापूर आणि औसा या 2 ठिकाणी भाजपचे आमदार, धाराशीवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. तर बार्शीत अपक्ष आमदार जिंकून आले आहेत.
याआधी युतीत धाराशीवची जागा शिवसेना, तर आघाडीत राष्ट्रवादी जागा लढवत होती. मविआत शरद पवारांच्या राष्ट्रवादी ठाकरेंचे विद्यमान खासदार असल्यामुळे ही जागा त्यांना सोडली. तर इकडे युतीत शिंदेंच्या शिवसेनेची जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला मिळालीय. मात्र उमेदवारावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नातं-गोत्यांसह अनेक ठिकाणची समीकरणंही रंजक आहेत.
‘या’ ठिकाणी नातं-गोत्यांसह समीकरणही रंजक
- आमदार रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष महायुतीचा घटक आहे. पण त्यांच्या पत्नी नवनीत राणांना भाजप प्रवेशानंतर उमेदवारी मिळालीय.
- राणा जगजितसिंह भाजपात आहेत. त्यांच्या पत्नी अर्चना पाटलांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश देत तिकीट दिलं गेलंय.
- हिंगोलीतून शिंदेंचे विद्यमान खासदार हेमंत पाटलांचा पत्ता कट झालाय. पण त्यांच्या पत्नी राजश्री पाटलांना त्यांचं माहेर असलेल्या यवतमाळमधून उमेदवारी मिळालीय.
- शिरुरचे आढळराव पाटील शिंदेंच्या शिवसेनेत होते. पण दुसऱ्या उमेदवाराऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं त्यांनाच प्रवेश देत उमेदवारी दिलीय.
- रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध रोहिणी खडसे या नणंद-भावजईत सामना होण्याची शक्यता होती. मात्र रक्षा खडसेंचे सासरे एकनाथ खडसेंची भाजपवापसी होणार आहे. तर त्यांच्या नणंद रोहिणी खडसेंनी आपण शरद पवारांच्याच राष्ट्रवादीत राहणा असल्याचं स्पष्ट केलंय.
- बारामतीत नणंद विरुद्ध भावजय सामना होतोय.
- धाराशीवमध्ये भावजय विरुद्ध दिरात लढत होतेय.
- वर्ध्यात भाजपच्या रामदास तडसांविरोधात त्यांच्याच सून पूजा तडस यांनी अपक्ष अर्ज भरलाय.
