रोहित आर्यचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सर्वात मोठा खुलासा
रोहित आर्यच्या मृत्यूचे कारण अखेर स्पष्ट झाले आहे. जे. जे. रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालानुसार, गोळी लागल्यानेच त्याचा मृत्यू झाला. गोळी छातीतून पाठीमागे बाहेर पडल्याने वाचण्याची शक्यता नव्हती. पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आर्य जखमी झाला होता.

पवई येथील आर. ए. स्टुडिओमध्ये १७ लहान मुलांना ओलीस ठेवून संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या रोहित आर्यच्या प्रकरणी एक नवीन अपडेट समोर आली आहे. रोहित आर्यचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्याच्या मृत्यूचे कारण नेमकं काय होतं, याबद्दलची माहिती आता समोर आली आहे. जे. जे. रुग्णालयात झालेल्या त्यांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे की, रोहित आर्यचा मृत्यू गोळी लागल्यानेच झाला. या गोळीचे स्वरूप पाहता त्यांच्या वाचण्याची कोणतीही शक्यता नव्हती, असे यात नमूद करण्यात आले आहे.
पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर
रोहित आर्य यांच्या मृतदेहावर शुक्रवारी उशिरा जे. जे. रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आले. या अहवालातील निष्कर्षानुसार, रोहित आर्य यांच्या छातीत गोळी लागली. ती त्यांच्या पाठीतून थेट बाहेर पडली. गोळी शरीराच्या एका भागातून घुसून दुसऱ्या भागातून बाहेर पडली. यामुळे त्यांच्या वाचण्याची शक्यता नव्हती. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओलीस सोडवण्याच्या ऑपरेशनदरम्यान रोहित आर्य यांनी पोलिसांवर एअर गनने गोळीबार केला. तेव्हा पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. ज्यात आर्य जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
पोस्टमॉर्टमनंतर रोहित आर्य यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर शनिवारी पहाटे पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी आर्य यांची पत्नी, मुलगा आणि काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
२ कोटी रुपयांची थकबाकी
दरम्यान रोहित आर्य यांनी महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाकडे स्वच्छता मॉनिटर या संकल्पनेसाठी सुमारे २ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा केला होता. या थकीत बिलासाठीच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे एका व्हिडीओमध्ये म्हटले होते. या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, मंत्री दादा भुसे यांनी रोहित आर्य यांच्या कंपनीचे शिक्षण विभागाशी असलेले सर्व व्यवहार आणि कामांचा अहवाल मागवला आहे. तसेच, पोलिसांच्या कारवाईत आर्य यांचा मृत्यू झाल्यामुळे, नियमानुसार न्यायिक दंडाधिकारी चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे.
