Rohit Arya Encounter Case : आता कोणीही बिल मागणार नाही…रोहित आर्याच्या एन्काउंटरनंतर सोशल मीडिया पोस्टची चर्चा!
पवई येथील स्टुडिओत रोहित आर्या याने 17 लहान मुलांना ओलीस ठेवले होते. त्याचे एन्काऊंटर करण्यात आले आहे. याच प्रकरणात आता गंभीर स्वरुपाचे दावे केले जात आहेत. रोहित आर्या याचे सरकारकडे कामाचे बील अडकले होते, असे बोलले जात आहे.

Rohit Arya Encounter Case : मुंबईमधील पवई येथील आरए स्टुडिओत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या याचा पोलिसांनी केलेल्या कारवाईत मृत्यू झाला आहे. त्याने आरए स्टुडिओत एकूण 17 लहान मुलांना डांबून ठेवले होते. रोहित आर्या याने एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते दीपक केसरकर यांच्याशी बोलण्याची मागणी केली होती. असे असतानाच आता एक्स या समाजमाध्यमावरील एका पोस्टची सगळीकडे चर्चा होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारकडे अडकलेल्या कामाचे पैसे मिळवण्यासाठी रोहित प्रयत्न करत होता. आता त्याचे एन्काऊंटर झाल्याने त्याच्या बिलाचे पैसे मिळण्याचा विषयच संपला आहे, असे या पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे.
भैय्या पाटील यांनी केले फोटो अपलोड
सामाजिक कार्यकर्ते भैय्या पाटील यांनी त्यांच्या एक्स खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी माजी मंत्री दीपक केसरकर आणि आयुक्त सुरज मांढरे यांची नावे घेतली आहेत. सोबतच रोहित आर्या याच्या प्रसिद्धी पत्रकाचे त्याने बिल मिळावे यासाठी केलेल्या उपोषणाचे काही फोटोही अपलोड केले आहेत. रोहित आर्या याच्या फेसबुक पोस्टचा स्क्रिनशॉटही भैय्या पाटील यांनी पोस्ट केला आहे.
पाटील यांच्या पोस्टमध्ये नेमके काय आहे?
भैय्या पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये रोहित आर्या याचे नाव घेतलेले नाही. त्यांनी फक्त एक कंत्राटदार असा उल्लेख केला आहे. मात्र त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये रोहित आर्याची प्रेस नोट आणि त्याचा फोटो स्पष्ट दिसत आहेत. “एक कॉन्ट्रॅक्टर शिक्षण विभागाचा एक प्रोजेक्ट व्याजाने पैसे काढून घेतो व पूर्ण करतो. त्याचे बिल निघत नाही. 3 वर्ष व्याजाने हैराण होतो.. मंत्री दीपक केसरकर, स्वच्छ प्रतिमेचे आयुक्त (ज्यांच्यावर कृषी खात्यातील बदल्यामध्ये 150 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे) सुरज मांढरे यांना तो भेटतो. त्यांचे प्रोटोकॉल पण पूर्ण करतो. पण त्याला हे लोक दाद देत नाहीत. त्यामुळे या लोकांच्या नावाने हा आंदोलन करतो उपोषण करतो. याला हे सगळ करून त्याचे बिल निघत नाही,” असे या पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे.
आता कॉन्ट्रॅक्टर असा वेडेपणा नाही करणार
“शेवटी हा 17 मुलांना बंधक बनवून साऊथ स्टाईल हिरो व्हायला जातो. त्याला वाटतं त्याचं बिल निघेल. पण प्रशासनाच्या दृष्टीने हा मनोरुग्ण. त्याला गोळ्या घातल्या आणि मुलांना सुरक्षित वाचवले. आता मंत्री आणि अधिकाऱ्यांनी फसवलेला कोणी कॉन्ट्रॅक्टर असा वेडेपणा नाही करणार. माजी मंत्री दीपक केसरकर आणि आयुक्त सुरज मांढरे यांना आज शांत झोप लागेल. एक मनोरुग्ण त्यांना कधीच बिल मागणार नाही,” असेही या पोस्टमध्ये म्हणण्यात आले आहे.
रोहित आर्यासोबत कोणताही करार नाही
दुसरीकडे स्वच्छता आर्या याला स्वच्छता मॉनिटर या मोहिमेसाठी 2 कोटी रुपये देण्याचा कोणताही करार झालेला नाही. त्याने स्वयंसेवा म्हणून हा प्रकल्प राबवला होता. त्याबाबत त्याला प्रमाणपत्र देण्यात आले होते, असे स्पष्टीकरण शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे.
एक कॉन्ट्रॅक्टर शिक्षण विभागाचा एक प्रोजेक्ट व्याजाने पैसे काढून घेतो व पूर्ण करतो..त्याचे बिल निघत नाही.. 3 वर्ष व्याजाने हैराण होतो.. मंत्री दीपक केसरकर, स्वच्छ प्रतिमेचे आयुक्त (ज्यांच्यावर कृषी खात्यातील बदल्यामध्ये 150 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे)सुरज मांढरे यांना… pic.twitter.com/1QhRWUVswf
— Bhaiya Patil (@BhaiyaPatil) October 30, 2025
रोहित आर्या याचे मुळ नाव रोहित हारोलीकर
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी पवई पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लाखमी गौतम, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना आणि डीसीपी दत्ता नलावडे पवई पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवल्याचे प्रकरण आता गुन्हे शाखेकडे वर्ग झाले आहे. तर दुसरीकडे रोहित आर्या याचे मुळ नाव रोहित हारोलीकर अस असल्याचे त्याच्या सोसायटीतील लोक सांगत आहेत. पुण्यातील कोथरूड भागातील स्वरांजली सोसायटीमध्ये रोहित आर्याचे आईवडील राहतात अशी माहिती समोर येत आहे.
