Rohit Arya Encounter : रोहित आर्याचं एन्काऊंटर का केलं? त्याला काय हवं होतं? पोलिसांनी कारवाई कशी केली? 10 प्रश्नांची 10 उत्तरं!
मुंबईतील पवई स्टुडिओत रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने लहान मुलांना डांबून ठेवले होते. पोलिसांच्या कारवाईत रोहितचा मृत्यू झाला आहे. पीएसआय अमोल वाघमारे यांनीच रोहित आर्याचा एन्काऊंटर केला.

Rohit Arya Encounter Case : मुंबईतील पवई येथे असलेल्या आरए स्टुडिओत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या याचे एन्काऊंटर करण्यात आले आहे. ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ऑपरेशन राबवले. पोलिसांनी बाथरुमच्या खिडक्या तोडून स्टुडिओत प्रवेश केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्याच्या छातीजवळ गोळी लागली आणि यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आता हा रोहित आर्या कोण आहे? त्यांनी किती मुलांना ओलीस ठेवलं होतं? पोलिसांनी कशी कारवाई केली? ऑपरेशन कसं राबवलं असे विचारले जात आहे? याच सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…
प्रश्न- कोणत्या मुलांना स्टुडिओत बोलावलं, मुलांचे वय किती होते?
उत्तर- साधारण 10 ते 15 वर्षे वय असणाऱ्या मुलांना आरए स्टुडिओत बोलावण्यात आले होते.
प्रश्न- किती मुलांना ओलीस ठेवले होते?
उत्तर- रोहित आर्या याने एकूण 17 मुलांना डांबून ठेवले होते. यात एक ज्येष्ठ नागरिकाचाही समावेश होता.
प्रश्न- नेमके काय सांगून मुलांना स्टुडिओत बोलवलं?
उत्तर- ओलीस ठेवलेल्या 17 मुलांना एका वेबसिरिजसाठी ऑडिशन आयोजित करण्यात आले आहे. तुमची निवड झाल्यास वेबसिरीजमध्ये काम करायला मिळेल, असे सांगत मुलांना आरए स्टुडिओत बोलवण्यात आले.
प्रश्न- मुलांकडून फी घेण्यात आली का? फॉर्म भरण्यात आले का?
उत्तर- या मुलांकडून फॉर्म भरून घेण्यात आले होते की नाही, याबाबत स्पष्टपणे माहिती मिळू शकलेली नाही. फी बद्दलही अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
प्रश्न- मुले किती वाजता स्टुडिओत पोहोचले?
उत्तर- गेल्या सहा दिवसांपासून पवईतील आरए स्टुडिओत ऑडिशन चालू होते. सकाळी 10 वाजता ऑडिशन चालू व्हायचे त्यानंतर मुलांना रात्री 8 वाजता सोडले जायचे.
प्रश्न- मुलांना ओलीस ठेवून कोणती मागणी करण्यात आली?
उत्तर- रोहित आर्या याने मुलांना ओलीस ठेवून एक व्हिडीओ जारी केला होता. मला काही प्रश्न विचारायचे आहेत. मला काही बोलायचं आहे, असं त्यांन या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. मात्र त्याची मागणी काय होती, हे त्याने व्हिडीओत सांगितले नव्हते. त्यामुळे त्याने मुलांना ओलीस का ठेवले हे समोर येऊ शकले नाही.
प्रश्न- पोलीस किती वाजता पोहोचले?
उत्तर- नेहमीप्रमाणे मुलं ऑडिशनसाठी सकाळी दहा वाजता गेले. मुलांना दुपारी एक ते दोन वाजेदरम्यान जेवणासाठी सोडण्यात येते. मात्र आज मुलं बाहेर आलीच नाहीत. त्यानंतर मुलांना ओलीस ठेवल्याचे समजल्यानंतर दुपारी एक ते पाच वाजेदरम्यान पोलिसांनी कारवाई केली.
प्रश्न- मुलांना डांबून ठेवले आहे हे पालकांना कधी समजले?
उत्तर- ऑडिशनला स्टुडिओत गेल्यानंतर मुलं दुपारी जेवणासाठी बाहेर यायची. आज मात्र मुलांना बाहेर सोडण्यात आले नाही. त्यांतर दुपारच्या सुमारास आपल्या मुलांना डांबून ठेवल्याचे पालकांना समजले.
प्रश्न- पोलिसांनी स्टुडिओत कसा प्रवेश केला?
उत्तर- पोलिसांनी सुरुवातीला रोहित आर्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने पोलिसांनी स्टुडिओच्या बाथरुमच्या काचा फोडल्या आणि आत प्रवेश केला. त्यानंतर पोलिसांनी मुलांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी रोहित आर्यावर गोळीबार केला. यामध्ये त्याच्या छातीला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला.
प्रश्न- रोहित आर्याचा एन्काऊंटर कोणी केला?
उत्तर- पीएसआय अमोल वाघमारे यांनी रोहित आर्याचा एन्काऊंटर केला आहे. पर्याय नसल्याने गोळीबार करावा लागला, असे एपीआय वाघमारे यांनी सांगितले आहे.
