Ladki bahin yojana : 1 लाख बहिणींना भाऊरायाचा ठेंगा; तुमचे तर यादीत नाही ना नाव? योजनेची क्रेझ पण ओसरली, अपडेट काय?
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा भार सोसवेना आणि आता माघार ही घेता येईना अशी राज्य सरकारची परिस्थिती झाली आहे. अगोदर सरसकट लाभ देणाऱ्या सरकारने आता विविध निकषांची कात्री लावली आहे.

लाडकी बहीण योजनेची वर्षपुर्ती सुरू आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच या योजनेचा मोठा गाजावाजा झाला. विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेचा डंका वाजवण्यात आला. सरसकट सर्वच महिलांना या योजनेचा लाभे देण्याची घोषणा झाली आणि मानधन पण जमा झाले. पण या योजनेत अनेक भाऊरायांनी शिरकाव केला. योजनेला मग निकषांची गाळणी लावण्यात आली. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. आता नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यात अनेक बहिणी योजनेतून बाद झाल्या आहेत. आता त्यात 1 लाख बहिणींची भर पडली आहे.
1 लाख 4 हजार महिला वंचित
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 20 हजार लाडक्या बहिणी वयाच्या निकषात बसत नसल्याचे तपासणीत समोर आले. या लाडक्या बहिणी एकतर 20 वर्षांखालील अथवा 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या असल्याची माहिती पडताळणी समोर आली आहे. तर 84 हजार अर्ज हे एकाच घरातील 3 महिलांचे असल्याचे समोर आले. सध्या अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू करण्यात आली आहे. त्यात एकाच घरातील तीन अथवा त्यापेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे 1 लाख 4 हजार महिला आता या योजनेच्या लाभापासून वंचित होतील. या बहिणींचे 1500 रुपयांचे मानधन तातडीने थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात 26 लाख संशयित लाभार्थ्यांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कार्यवाही करण्यात आली आहे. आता इतर जिल्ह्यात सुद्धा अशी कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही काळात लाभार्थ्यांची संख्येत मोठी कपात होण्याची शक्यता आहे.
योजनेची ओसरली क्रेझ
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी तहसील कार्यालयापासून ते सेतू सुविधा केंद्र आणि इतर महासुविधा केंद्रावर एकच झुंबड उडाली होती. या योजनेत अर्ज करण्यापासून इतर कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी महिलांमध्ये मोठी क्रेझ होती. त्यांची धावपळ त्यावेळी माध्यमांनी टिपली होती. पण आता या योजनेची क्रेझ ओसरत असल्याचे आढळून आले. या योजनेला छाननीची गाळणी लावण्यात आली आहे. अनेक महिलांचे अर्ज बाद झाले आहे. तर योजनेतील अनागोंदी पण समोर आली आहे. अनेक भावांनी योजनेवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. आता हाती आलेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी गेल्या 5 महिन्यात नव्याने अर्ज येण्याचे प्रमाण शुन्यावर आले आहे. या योजनेकडे लाडक्या बहिणींसुद्धा पाठ फिरवल्याचे चित्र आहे. सरकार निकषांची कात्री लावत असल्याने आता कागदपत्रांचा खटाटोप आणि धावपळीचा सोस करायचा कशाला असा सवाल लाडक्या बहिणी करत आहे. त्यामुळे महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेली ही योजना बहिणींची नाराजी ओढावणारी ठरू नये म्हणजे मिळवलं असेच म्हणावे लागेल.
