बॉलिवूड कलाकारांनी मुंबई सोडून जावं म्हणून बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र; संजय राऊत यांचा आरोप

एनसीबीच्या पंचानेच एनसीबीवर तोडपाणीचे आरोप केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत आक्रमक झाले आहेत. एनसीबीच्या कारवायांवरून राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. (sanjay raut claims conspiracy to move Bollywood)

बॉलिवूड कलाकारांनी मुंबई सोडून जावं म्हणून बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र; संजय राऊत यांचा आरोप
sanjay raut

नाशिक: एनसीबीच्या पंचानेच एनसीबीवर तोडपाणीचे आरोप केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत आक्रमक झाले आहेत. एनसीबीच्या कारवायांवरून राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईत सिनेसृष्टी आहे. सिनेसृष्टी ही मुंबईचं वैभव आहे. बॉलिवूड कलाकारांनी मुंबई सोडून जावं म्हणूनच सिनेसृष्टीला बदनाम केलं जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. मुंबईत सिनेसृष्टी आहे. ती मुंबईचं वैभव आहे. ही सिनेसृष्टी बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. एनसीबीच्या माध्यमातून हे षडयंत्र रचलं जात आहे. जेणेकरून मुंबईतून या लोकांनी निघून जावं अशाप्रकारचं षडयंत्र रचलं जात आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.

सरकारने स्यूमोटो कारवाई करावी

सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूनंतर एनसीबी नावाचा प्रकार आहे हे दिसून आलं. मुंबई महाराष्ट्रात एनसीबी फारच कामाला लागली आहे. जणू काही मुंबई-महाराष्ट्रात अफगाणिस्तान, पाकिस्तानप्रमाणे गच्चीवर, घरातघरात, बाल्कनीत चरस-गांजाचे पिके काढतात, या राज्याचे लोकं अफू-गाजांचा व्यापार करतात, अशी एक बदनामी देशभरात सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने स्यूमोटो घेऊन या प्रकरणी कारवाई केली पाहिजे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.

न्यायालयीन चौकशी व्हावी

कालपासून एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईचे काही पुरावे समोर येत आहेत. जे पुरावे किंवा पंच म्हणून पुढे आले ते कोण होते? किती संशयास्पद चारित्र्याचे हे लोकं होते, त्याच्यामध्ये पैशांची देवाणघेवाण कशी झाली याचे पुरावे आता समोर आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच सांगितलंय की, अंमली पदार्थाच्या निमित्ताने महाराष्ट्राला बदनाम करण्याची काही लोकांनी सुपारी घेतली आहे. ते आता सिद्ध झालं आहे. आज दोन प्रमुख व्हिडीओ समोर आले आहेत. ते बोलके आहेत. लपवाछपवी करण्याची गरज नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र सरकारने करावी. न्यायालयीन चौकशी करावी. कारण हे प्रकरण साधं नाही, असंही ते म्हणाले.

एका सुपरस्टारच्या मुलाला अटक केली, कारवाई केली. ते ठीक आहे. त्यावर मी काही बोलणार नाही. पण सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणापासून ते रिया चक्रवर्तीपासून अन्य काही लोकं असतील, सतत असे गुन्हे निर्माण केले की त्यांच्या कारवाईवर संशय यावा. त्याच्यावर कुणी संशय निर्माण केला की मग आरोप करणाऱ्यांवर तुम्ही राष्ट्रद्रोही आहात अशी टीका केली जाते. पाकिस्तानचे ब्रँड अॅम्बेसिडर आहात, असं म्हटलं जातं, असा टोला त्यांनी लगावला.

मलिक मुस्लिम म्हणून त्यांच्यावर आरोप होत आहेत

माझा महाराष्ट्र बदनाम होतोय. कॅबिनेट मंत्री नवाब मलिक हे फक्त मुस्लिम समाजाचे आहेत, म्हणून त्यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांनी काही पुरावे समोर आणले आहेत. नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एनसीबीच्या कारवाईवर पुराव्यासह प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. त्यांचा कोणताही आरोप हा हवेतला गोळीबार नव्हता. खरंतर त्यांच्या पाठीशी संपूर्ण मंत्रिमंडळाने ठामपणे उभं राहायला पाहिजे होते, असं ते म्हणाले.

सरकार पडणार नाही

सरकार पाडण्यासाठी काही लोकं गांजा मारून काम करत असले तरी आम्ही शुद्धीत आहोत. हा पकडलेला गांजा असतो एनसीबी त्यांना पुरवत असेल आणि त्या गांजाच्या नशेत कोणी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर नशेत ते पडतील सरकार पडणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

 

संबंधित बातम्या:

समीर वानखेडेसह एनसीबीवर पंचाचाच बाँब, शाहरुख खानकडे 25 कोटी मागितल्याचा दावा, वानखेडेला 8 कोटी द्या!

गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे; नवाब मलिक म्हणतात, एसआयटीमार्फत चौकशी करा

Sanjay Raut : ‘त्या’ व्हिडीओमध्ये आर्यन कुणाशी बोलतोय? संजय राऊतांकडून खळबळजनक व्हिडीओ शेअर

(sanjay raut claims conspiracy to move Bollywood)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI