महिला डॉक्टरचे त्याला अनेक फोनकॉल, शेवटचा कॉल…सातारा प्रकरणातील नव्या माहितीने खळबळ!
साताऱ्यातील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. आता महिला डॉक्टर आणि आरोप प्रशांत बनकर यांच्यात अनेकवेळा फोन कॉल झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

Satara Doctor Death Case : साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिने तळहातावर लिहिलेल्या संदेशात तिने एका पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार तसेच अन्य पोलीस अधिकाऱ्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली असून या प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहेत. दरम्यान, याच प्रकरणात आता अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी खळबळजनक आणि मोठी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रशांत बनकर आणि मयत डॉक्टर यांच्यात बऱ्याच वेळा फोन कॉल झालेले आहेत.
महिला डॉक्टर सहकार्य करत नसल्याची पोलिसांची तक्रार
सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत डॉक्टर यांची पोलिसांबद्दल तक्रार होती आणि पोलिसांनीदेखील आरोपीचे मेडीकल रिपोर्ट बनवण्यात मयत डॉक्टर महिला सहकार्य करत नसल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या तक्रारीच्या दृष्टीनेदेखील तपास सुरू आहे, असे वैशाली कडुकर यांनी सांगितले आहे. सोबतच मयत डॉक्टर महिलेने पोलीस सुरक्षेची मागणी केली हे दिसून येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रशांत बनकर याच्यासोबत अनेकवेळा फोनकॉल
पुढे वैशाली कडुकर यांनी महिला डॉक्टरच्या आत्महत्येत आरोपी असलेल्या प्रशांत बनकरबाबतही मोठी माहिती दिली आहे. असुरक्षित वाटू लागल्याने महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यासाठी हॉटेलचा सहारा घेतला आहे का याबाबत तपास सुरू आहे. मयत डॉक्टर महिलेचे शेवटचे बोलणे हे संशयित आरोपी प्रशांत बनकर याच्याशी झाले होते. प्रशांत बनकर आणि मयत डॉक्टर असलेल्या महिलेशी खूप वेळा फोन झाले आहेत, अशी मोठी माहिती वैशाली कडुकर यांनी दिली. सोबतच व्हाट्सअप चॅटिंगचाही पोलीस प्रशासन तपास करत आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
पोलिसांनी नेमकी कोणती तक्रार केली होती
पोलिसांनी मृत महिला डॉक्टरविरोधात कोणती तक्रार केली होती, असे विचारले जात आहे. याविषयीही वैशाली कडुकर यांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी केलेली तक्रार ही प्रशासकीय तक्रार आहे. पोलीस आणि वैद्यकिय अधिकारी नेहमी सहयोगाने काम करत असतात. मेडिकल ऑफिसरने दिवस आहे की रात्र हे बघू नये. आरोपीला अटक होण्यापूर्वी पोलीस प्रशासन दिवस आहे की रात्र आहे हे बघत नाही. अटेकपूर्वी आरोपी मेडिकली फिट आहे की नाही हे बघाव लागतं. मयत डॉक्टर सहकार्य करत नसल्याची तक्रार आहे, असे पोलीस अधिकारी वैशाली कडुकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आता मयत डॉक्टर आणि प्रसांत बनकर यांच्यात फोन कॉल झालेले आहेत, हे समोर आल्यानंतर पुढे काय होणार? कोणती नवी माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
